मराठा आरक्षण : घुसखोरी नको, अन्यथा ओबीसी शांत बसणार नाही : सचिन माळी

  • Namdev Anjana
  • Published On - 15:30 PM, 20 Nov 2018
मराठा आरक्षण : घुसखोरी नको, अन्यथा ओबीसी शांत बसणार नाही : सचिन माळी

पुणे : इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी आमची ठाम भूमिका आहे. तसे केल्यास ओबीसी समाज शांत बसणार नाही, असे विद्रोही शाहीर सचिन माळी म्हणाले. एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर, ओबीसी समाजाने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्याच मुद्द्यावर आज पुण्यात राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी समाजाची पत्रकार परिषद झाली. यावेळी शंकरराव लिंगे, सचिन माळी, प्रा. शिवाजी दळणार, अप्पा धायगुडे, सपना माळी, सुधीर पाषाणकर, प्रतापराव गुरव, सुरेश गायकवाड, आनंदा कुदळे यांची उपस्थिती होती.

सचिन माळी नेमके काय म्हणाले?

“मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देता येईल. मात्र मराठा आणि ओबीसी यांच्यात सरकारला संघर्ष लावून द्यायचा आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, अशी आमची ठाम भूमिका आहे.” असे सचिन माळी म्हणाले.

मराठा समाजाला एसईबीसीमध्ये आरक्षण देणार, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र हा फक्त शब्दच्छेल आहे, अशी टीका सचिन माळींनी केली. तसेच, “खासगी संस्थांना सर्व्हे करण्याचा अधिकार पहिल्यांदाच मागासवर्ग आयोगाने दिला. मागासवर्ग आयोगाच्या समितीत मागासवर्गीय लोक कमी आहेत.” असा आरोपही सचिन माळींनी केला.

आयोगाचा अहवाल लिक करण्यात आला आहे, लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी अहवाल लिक करण्यात आला, असेही सचिन माळी म्हणाले.

आमच्या घरात घुसखोरी नको : सचिन माळी

“मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नव्हता, आजही नाही. आमच्या घराशेजारी कुणी दुसरा घर बांधत असेल, तर त्यांच्या घरासाठी पाया खणण्यापासून विटा वाहण्यापर्यंत आम्ही सर्व ओबीसी बांधव आमच्या मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, ही भूमिका आम्ही आधीपासून घेतलेली होती. पण शेजारी घर बांधतो म्हणून त्यांनी मोर्चे काढले, तुमच्या शेजारीच आम्ही असू असे सांगितलं आणि ज्यावेळी अहवाल आला, त्यावेळी आम्हाला स्वतंत्र घर बांधायचं नाही, तर आम्हाला तुमच्याच घरात प्रवेश करायचा आहे, आणि तुमचंच घर जे आहे, ते आमचंच आहे, अशा पद्धतीची एक भूमिका मराठा नेतेमंडळीची बदललेली दिसून येते आहे.” – सचिन माळी

मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 नोव्हेंबर 2018 रोजी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “इतर मागास वर्गाला म्हणजेच ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार, अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते. त्यामुळे मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गाअंतर्गत राज्य सरकार आरक्षण देईल. त्यामुळे सध्या आरक्षण घेणाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही.”

असे असतानाही ओबीसी समाजातील नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दरम्यान, मराठा समाजाला डिवचू नका, अन्यथा कोर्टात गेलो आणि केस केली, तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल, असा इशारा बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी समाजाला दिला होता.

तर ओबीसी आरक्षण जाईल – बाळासाहेब सराटे

मराठा आरक्षणाचा अहवाल आल्यापासून ओबीसी आणि मराठा समाजातील नेते समोरासमोर आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी खळबळजनक दावा केला आहे. मराठा समाजाला डिवचू नका, अन्यथा कोर्टात गेलो आणि केस केली तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब सराटे यांनी मराठा आणि ओबीसी या वादावरही भाष्य केलं. त्याचवेळी मराठा समाजाला डिवचू नये, असा इशाराही दिला. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

विशेष प्रवर्गातून दिलेलं आरक्षण कोर्टात न टिकणारं : उल्हास बापट

मराठा समाजाला एसईबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग यामधून आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. पण हे आरक्षण देताना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरु झाला आहे. मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून दिलेलं आरक्षण हे घटनाबाह्य असेल आणि ते कोर्टात टिकू शकत नाही, असं राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी सांगितलं आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

कोण आहेत सचिन माळी?

कवी आणि विद्रोही शाहीर म्हणून सचिन माळी महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र, त्यांच्यावर नक्षलवादाचा आरोप आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक, यामुळे ते अधिक प्रकाशझोतात आले. सचिन माळी आणि त्यांची पत्नी शीतल साठे यांना नलक्षलवादाचा आरोप ठेवण्यात आला होता. याच आरोपाखाली सचिन माळी यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. तर मानवी आधारावर शीतल साठे यांना जामीन देण्यात आला होता. दरम्यान, सचिन माळी आणि शीतल साठे हे दोघेही सध्या शाहीर म्हणून कार्यक्रम करतात.

VIDEO : ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद :