लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच मनोज जरांगे यांचे उपोषणअस्त्र, आता मरेपर्यंत उपोषण
Manoj Jarange Patil Fasting: मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. सरकारकडून षडयंत्र केले जात आहे, लोक फोडली गेली, गेली 10 महिने हा प्रकार सुरू आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. मी समाजासाठी जीव द्यायला तयार आहे. पण आता मागे हटणार नाही.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणअस्त्र वापरले आहे. मनोज जरांगे पाटील सगे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यासंदर्भातील कायदा पारित करण्यासाठी ४ जूनपासून उपोषण सुरु करणार आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील उपोषण सुरु करणार आहे. आता हे उपोषण कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर मरेपर्यंत सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सगे-सोयरेच्या कायदा करायला काय किती दिवस पाहिजेत? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे यांचा राज्य सरकारवर घणाघात
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. सरकारकडून षडयंत्र केले जात आहे, लोक फोडली गेली, गेली 10 महिने हा प्रकार सुरू आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. मी समाजासाठी जीव द्यायला तयार आहे. पण आता मागे हटणार नाही. मी पैसांसाठी समाजाशी बेईमान करणार नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गोडीगुलाबीने हाताळावा. तुम्ही काड्या केला तर असा खुटा ठोकीन की तो ट्रॅक्टरने काढता येणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
विधानसभेची तयारी, 288 मतदार संघात उमेदवार
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरु केली. आपण 288 मतदार संघात सर्व जाती धर्माचे उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, माझा राजकारण मार्ग नाही, मला राजकारणाकडे ओढू नका. मला सगे सोयऱ्याची अंमलबजावणी द्या. आम्हाला इतर काही घेणे-देणे नाही. तुम्ही सगे-सोयरे आम्हाला दिले तर हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. आता तुमचे डावपेच बंद करा, तुमच्या दहा पिढ्या आल्या तरी हे आंदोलन हटणार नाही.
मराठा समाजाने मिरवणुकीत जायचे नाही
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या निकालानंतर कोणीही निवडून आले तरी कोणी पोस्ट पण करायची आणि जयजयकार ही करायचा नाही. तसेच कुणाच्या मिरवणुकीत जायचे नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाने शांत राहायचे आहे.
