‘सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली’, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर मराठा तरुण आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते आंदोलनाला बसले आहेत.

'सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली', मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर मराठा तरुण आक्रमक
मराठा आरक्षणप्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंची बैठक


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजही आक्रमक झाल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्यातील सर्वच पक्षांनी केल्याचा आरोप या तरुणांनी केलाय. (Maratha youth agitation outside CM Uddhav Thackeray’s official residence)

मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका ही चालढकल करण्याची राहिली आहे. समाज आता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. एक वेगळं संघटन, एक वेगळा पक्ष असावा अशी समाजाची भावना आहे. वेळ पडली तर आरक्षण मिळवण्यासाठी हा लढवय्या समाज आक्रमक होईल, असा इशारा मराठा समन्वयक अंकूश कदम यांनी दिलाय. दरम्यान, शुक्रवारी दुपारी वर्षा बंगल्याबाहेर मराठा समाजातील तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली.

संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांची बैठक

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजी राजे सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणही आहेत. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संभाजीराजे छत्रपती संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत.

संभाजीराजे वेगळा पक्ष काढण्याच्या तयारीत?

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात प्रस्थापित पक्षांना अपयश येत असल्याने आता संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष स्थापन करावा, असा आग्रह मराठा समाजातील प्रमुख लोकांनी त्यांच्याकडे आग्रह धरला आहे. सर्व सामान्य जनता संभाजीराजेंच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील, असे या नेत्यांना वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी राजर्षी शाहू महाराज यांना सर्वच जाती धर्माचे लोक मानतात. संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या चळवळींचे नेतृत्व करत असले तरी सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळेल, असं या लोकांना वाटत आहे.

सोशल मीडियातून चळवळ

संभाजीराजेंनी नवा राजकीय पक्ष काढावा म्हणून आता सोशल मीडियातून चळवळ सुरू झाली आहे. ‘मराठा समाजातील तरुणांचे एकच लक्ष्य, छत्रपती संभाजीराजेंनी काढावा नवीन राजकीय पक्ष’, अशा आशयाचा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल केला जात आहे. अनेक तरुणांनी आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेट्सवर हा मजकूर ठेवला आहे. त्यामुळे संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

भाजप नेत्यांनी खासदार संभाजी छत्रपतींच्याविरोधात आघाडी उघडलीय का?

देवेंद्र फडणवीसांना हात जोडून सांगितलं, माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ : संभाजीराजे

Maratha youth agitation outside CM Uddhav Thackeray’s official residence

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI