
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विविध घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली आहे. आमचा मनोज जरांगे पाटील यांना कोणताही विरोध नाही. पण आम्ही मराठा म्हणूनच ५० टक्क्यांच्या आतून आरक्षण घेणार आहे. जर मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर ते टिकणार नाही. त्यामुळे करोडो मराठा बांधवांना त्याचा फायदा होणार नाही, असेही मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी ठणकावून सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यावर आता मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी आक्षेप घेतला आहे. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना विरोध करत नाही. परंतु आमची मागणी स्पष्ट आहे. आम्हाला आरक्षण मराठा म्हणूनच हवे आहे. जर सरसकट हा शब्द वगळला गेला, तर मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार? गेल्या ४५ वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. मराठा म्हणून नोंद असलेल्यांना कुणबी म्हणून आरक्षण देणे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असे सुनील नागणे यांनी नमूद केले.
गेल्या २५ वर्षांपासून ५०० हून अधिक लोक आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनासाठी अनेकांनी आपली घरदार विकली आहेत, तरीही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा टोपी घातलेली नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही आरक्षण मागत आहोत. टीका करणाऱ्या लोकांनी त्यांच्या त्यागाकडे आणि परिस्थितीकडे लक्ष द्यावे. आजही त्यांची जमीन सावकाराकडे गहाण असून, स्वतःची प्रसिद्धी न करता ते समाजासाठी लढत आहेत, असे सुनील नागणे यांनी सांगितले.
जर मला आणि माझ्यासारख्या लाखो मराठा बांधवांना आरक्षण मिळत नसेल, तर मी माझा आणि त्यांच्या भविष्याचा विचार करणार आहे. मरण पण हटणार नाही याचा अर्थ कोणाच्याही विरोधात नाही, तर आरक्षणाबाबतची ही ठाम भूमिका आहे. मराठा म्हणून आरक्षण कसे दिले जात नाही, ते आम्ही बघतो. आमची लढाई लढायला आम्ही तयार आहोत,” असा निर्धार सुनील नागणे यांनी व्यक्त केला.