नितीन नबीन भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी, शिक्षण किती, संपत्ती किती?
भाजपाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या बिहारच्या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.

Nitin Nabin : भाजपाचे नेते तथा बिहार सरकारमध्ये मंत्री असलेल्या नितीन नबीन यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांची भाजपाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते पटणा जिल्ह्यतील बांकीपूर येथून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे ते वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या पदावर बसणारे ते सर्वात कमी वयाचे भाजपाचे नेते आहेत. ते भाजपाचे दिवंगत नेते नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत. सध्या ते बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत.
नितीन नबीन यांचा राजकीय प्रवास
या वर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार नितीन नबीन यांचे शिक्षण इयत्त 12 वी पर्यंत झालेले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव दीपमाला श्रीवास्तव असे आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रीय झाले. राजकारणात पाय ठेवताच कमी काळात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी बिहारच्या 2010, 2015, 2020 आणि 2025 सालच्या एकूण चार विधानसभा निवडणुकीत सलग विजय मिळवलेला आहे. याआधी 2010 सालची पोटनिवडणूक लढवून ते पहिल्यांदा आमदार झाले. 2025 सालच्या निवडणुकीत त्यांना एकूण 98,299 मते मिळाली. त्यांनी रेखा कुमारी या आरजेडी पक्षाच्या उमेदवाराला 51,936 मतांच्या फरकाने पराभूत केले.
नितीन नबीन यांचे शिक्षण काय?
नितीन नबीन हे इयत्ता बारावीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी 1996 साली संत मायकल हायस्कुलमधून सीबीएसई बोर्डातून इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. 1998 साली ते नवी दिल्ली येथील सीएसकेएम पब्लिक स्कुलमधून इयत्ता बारावी पास झाले.
नितीन नबीन यांची संपत्ती किती?
शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार नितीन नबीन यांच्या जंगम संपत्तीचे एकूण मूल्य 99 लाख 71 हजार 478 रुपये आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे एकू 66 लाख 52 हजारांची जंगम मालमत्ता आहे. नबीन यांच्या नावाने कोणतीही जमीन नाही. त्यांच्या पत्नीच्या नावाने एक कोटी 47 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दरम्यानस नबीन यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर भविष्यात भाजपात कोण-कोणते बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
