फडणवीसांना जे जमलं नाही, ते राऊतांनी करून दाखवलं; नागपूर अग्निशमन दलात होणार मेगा भरती!

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे नागपूर महापालिकेत अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे (Mega recruitment to be held in Nagpur fire brigade).

फडणवीसांना जे जमलं नाही, ते राऊतांनी करून दाखवलं; नागपूर अग्निशमन दलात होणार मेगा भरती!
देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांचा फाईल फोटो

मुंबई : नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकारामुळे नागपूर महापालिकेत अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर मनपाच्या सुधारित सेवाप्रवेश नियमांना परवानगी मिळावी म्हणून राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता राज्य तंत्रशिक्षण परिषदेतर्फे मान्यता मिळालेल्या संस्थांमधून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे अग्निशमनविषयक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांनाही आता नागपूर मनपातील अग्निशमन सेवेत नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे (Mega recruitment to be held in Nagpur fire brigade).

यामुळे भविष्यात अग्निशमन सेवेतील मनुष्यबळ वाढल्याने सेवेची गुणवत्ताही वाढणार असून जिवित, वित्त हानी रोखण्याला मदत होणार आहे. सध्या नागपूर मनपातील अग्निशमन दलाला केवळ नागपूर शहरच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील प्रमुख आगी, एमआयडीसी परिसरातील आगी विझवण्यासाठी बोलावले जाते. केवळ 60 फायरमन असलेल्या या विभागातील कर्मचारी कामाच्या प्रचंड तणावात आहेत. नव्या सेवा प्रवेश नियमांना शासनाने मंजुरी दिल्याने आता नव्याने भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे (Mega recruitment to be held in Nagpur fire brigade).

फडणवीसांना काय जमलं नाही?

नागपूर महापालिकेतील सदस्यांनी तंत्रशिक्षण परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्याची शिफारस करणारा ठराव महापालिकेत डिसेंबर 2017 मध्ये पारीत केला होता. त्यानंतर तो राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. यानंतर जवळपास दोन वर्ष नागपूरचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असूनही हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडून मंजूर झाला नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री नितीन राऊत यांनी पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर हा विषय त्यांच्या निदर्शनास आला. नागपूर मनपातील अग्निशमन दलातील अधिका-यांशी चर्चा करून त्यांनी हा विषय समजावून घेतला.

पालकमंत्र्यांचा पुढाकार

नितीन राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारला पत्र दिले होते. “ नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी विभागाच्या 13 अग्निशमन केंद्रांच्या 872 पदांपैकी केवळ 202 पदे भरलेली असून 670 पदे रिक्त आहेत. यामुळे अग्निशमन दलाला सक्षमपणे काम करण्यात अडथळे निर्माण होत आहेत,” अशा शब्दात नितीन राऊत यांनी आपल्या पत्रात या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. नितीन राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आज (18 मार्च 2012) नव्या सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देणारा शासनादेश जारी करण्यात आला आहे.

शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना संधी का मिळत नव्हती?

नागपूर मनपातील फायरमन (विमोचक), लिडिंग फायरमन(प्रमुख विमोचक) या पदासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या अग्निशमन अकादमीच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र,मुंबई यांचा पाठ्यक्रम अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. मात्र राज्यातील विशेषतः विदर्भातील बहुसंख्य तरूणांना मुंबईतील राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण पुरे करणे शक्य नव्हते. त्यामुळे नागपूर महापालिकेत अग्निशमन दलासाठी पात्र मनुष्यबळ मिळणे शक्य होत नव्हते.

राज्य सरकारच्या राज्य तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थांतर्फे विविध अग्निशमनविषयक अभ्यासक्रम चालविले जातात. याशिवाय अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फेही अग्निशमन विषयक विविध अभ्यासक्रम चालवले जातात. मात्र आजवर तंत्रशिक्षण परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अभ्यासक्रमांना अग्निशमन सेवेतील नियुक्त्यांसाठी मान्यता नव्हती. परिणामी विदर्भात विशेषतः नागपूर परिसरात हा अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर असूनही ते नियुक्ती प्रक्रियेसाठी अपात्र ठरत होते.

स्थानिक युवकांना मिळणार रोजगार

नव्या निर्णयामुळे प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशमन विमोचक आणि मुख्य मेकॅनिक कम ड्रायव्हर या पदांसाठी आता स्थानिक युवकांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. प्रमु्ख अग्निशमन विमोचक आणि अग्निशमन विमोचकाच्या पदासाठी यापूर्वी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथील पाठ्यक्रम उत्तीर्ण झालेला उमेदवारच अर्ज करू शकत होता. आता यापदासाठी नव्या जीआरनुसार महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळाचा किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज दाखल करू शकणार आहे.

मुख्य मेकॅनिक कम ड्रायव्हर यापदासाठी यापूर्वी फिटर कम ड्रायव्हर यापदावर नियमित 3 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व सेवाज्येष्ठता योग्यता अधीन पात्रता या निकषावर पदोन्नती करणे आवश्यक होते. या नव्या नियमानुसार या पदासाठी आता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, आयटीआयमधील मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक वा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. जड वाहने चालविण्याचा परवाना आवश्यक, मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक, एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे.

हेही वाचा : UPA चं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा – संजय राऊत 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI