आईची मोलमजुरी, वडिलांचा भंगारांचा व्यवसाय तरीही पठ्ठ्या बनला अधिकारी, गुणवत्ता यादीत 18 वा क्रमांक
अकोला जिल्ह्यातील रोशनने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून MES परीक्षेत राज्यात 18वा क्रमांक पटकावला आहे. वडील भंगार व्यावसायिक असूनही, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर त्याने हे यश संपादन केले.

अकोला जिल्ह्यातील एका होतकरू तरुणाने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर एक असामान्य यश संपादन केले आहे.पातुर तालुक्यातील शिर्ला येथील भंगारविक्रेते हुसेनशहा यांचा मुलगा रोशन याने महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (MES) परीक्षेत राज्यात 18 वा क्रमांक पटकावला आहे. यामुळे त्याने त्याचे आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे.
रोशनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांचे वडील भंगार गोळा करून तुटपुंजे उत्पन्न मिळवतात. ज्यातून घराचा खर्च चालवले जायचे. त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी रोशनची आईसुद्धा मोलमजुरी करते. दुर्दैवाने, रोशनच्या दोन्ही बहिणींना केवळ आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण सोडावे लागले. अशा बिकट परिस्थितीतही, रोशनने मात्र शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. शिक्षण हेच या परिस्थितीवर मात करण्याचे एकमेव साधन आहे, हे त्याला माहिती होते.
अधिक जोमाने अभ्यास केला…
त्याने महाराष्ट्र इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (MES) परीक्षा देण्यास सुरुवात केली. मात्र त्याला पहिल्या प्रयत्नात मिळाले नाही. गेल्यावर्षीच्या MES परीक्षेत, तो केवळ 15 गुणांनी निवड होण्यापासून दूर राहिला होता. या अपयशामुळे अनेकजण नाउमेद होतात. पण रोशनने हार मानली नाही. त्याने या अपयशालाच आपल्या यशाची प्रेरणा बनवले. त्यानंतर त्याने अधिक जोमाने अभ्यास सुरू केला. त्याच्या याच अथक परिश्रमाचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे फळ त्याला 2024 च्या परीक्षेत मिळाले.
रोशनची गावातून मिरवणूक
त्याने केवळ परीक्षा उत्तीर्ण केली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून 18 वा क्रमांक मिळवून एक नेत्रदीपक कामगिरी केली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे, जलसंधारण अधिकारी पदासाठी त्याची निवड जवळजवळ निश्चित मानली जात आहे. रोशनच्या या यशाने केवळ त्याच्या कुटुंबातच नाही, तर संपूर्ण शिर्ला गावात आणि अकोला जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. दरम्यान रोशनने दहावीमध्ये देखील 92.42 टक्के मिळवले होते. रोशनने घेतलेली ही उंच भरारी निश्चितच त्यांच्या आई-वडिलांसाठी मान उंच करणारी आहे. रोशनच्या घवघवीत यशाची बातमी गावभर पसरली आणि गावकऱ्यांनी अक्षरशः रोशनची गावातून मिरवणूक काढली.
