धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे भेटीला, कारण गुलदस्त्यात
धनंजय मुंडे यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपपत्रातील धक्कादायक खुलाशांनंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करताना, त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानतंर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणात्सव राजीनामा दिल्याचे सांगितले. यानंतर आता धनंजय मुंडेंच्या भगिनी आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच भेट
मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे या नुकत्याचधनंजय मुंडे यांचे निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यावर पोहोचल्या. रात्री ९ च्या आसपास त्या त्यांच्या कारने धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर पोहोचल्या. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे आजारी आहेत. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. यानंतर त्यांना डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यातच त्यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला. त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलताही येत नव्हते. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्याने भेट घेतल्याचे बोललं जात आहे.
धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे”, असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले होते.
