आज मुझे बडा काम मिला है; घरावर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं? शिरसाट यांनी सगळं सांगितलं
संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मद्यधुंद अवस्थेत तरुणानं जोरदार राडा केला आहे, त्यावर आता शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच त्याने शिरसाट यांच्या घराच्या परिसरात आरडाओरडही केली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार हा तरुण मद्यधुंद अवस्थेमध्ये होता, मद्यधुंद अवस्थेमध्येच त्याने संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला. दरम्यान मध्यरात्री नेमंक काय घडलं? याबाबत आता संजय शिरसाट यांनी माहिती दिली, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिरसाट नेमकं काय म्हणाले?
माझ्या घरावर हल्ला करणारा हा सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर 302 चे गुन्हे दाखल आहेत, माझ्या घरावर ज्याने हल्ला केला, तो त्याच्या मित्राला सांगत होता ‘ आज मुझे बडा काम मिला है”, मी ही घटना साधारण समजत होतो पण आता ती गंभीर होणार आहे. मी पोलिसांशी बोलून याबाबत माहिती घेणार आहे. मी त्याला ओळखत नाही, आरोपी माझ्या मतदारसंघातील आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला अनेक वेळा धमक्या आल्या, पण मी कधी बोललो नाही, पण हे प्रकरण वेगळं आहे. आरोपी पोलिसांना धमकावत होता, अशा लोकांना जरब बसणे आवश्यक आहे. जो आरोपी पकडला गेला आहे, त्याचा पोलीस योग्य तपास करतील, मला जास्तीचे पोलीस संरक्षण घेण्याची गरज नाही.
सीसीटीव्ही कॅमेरा बंद
हल्ला झाला तेव्हा लाईट बंद असल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेले होते. लाईट गेली होती आणि जनरेटर चालू करायला वेळ लागला, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच त्याने शिरसाट यांच्या घराच्या परिसरात आरडाओरडही केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
