पोलिसांनी सोडताच अविनाश जाधव मोर्चात, म्हणाले मोर्चाचा मार्ग…
मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या हक्कासाठी मनसेने काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी बंदी घातली. मनसे नेते अविनाश जाधव यांची अटक झाली. मोर्चा मराठी माणसाच्या एकीचा विजय असल्याचे जाधव यांनी म्हटले. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारण्यामागील कारण म्हणजे आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार. यामुळे मराठी संघटनांमध्ये तीव्र संताप आहे.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मनसे आणि शिवसेना यांनी आज सकाळी मीरा-भाईंदर येथील बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत मोर्चाची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत आज पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. या घडामोडींदरम्यान, मीरा-भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये मनसेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण अधिकच तापले असून, मनसेसह अन्य मराठी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.
अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर मोर्चा सुरु झाल्यानंतर काही वेळाने त्यांना सोडण्यात आले. यानंतर त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मीरा भाईंदरमधील हा मोर्चा म्हणजे मराठी माणसाच्या एकीचा विजय आहे. मीरा भाईंदरमध्ये फक्त १५ टक्के किंवा १२ टक्के मराठी आहे, बाकीचे सर्व बाहेरुन आलेत, आज त्या सर्वांना या मोर्चाने उत्तर दिलंय, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
मराठी माणूस त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही
“एक मराठी माणूस म्हणून त्यांनी आमच्या मोर्चाला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आभार मानतो. त्याचे मराठीवर प्रेम असेच राहावे. मीरा भाईंदरमध्ये फक्त १५ टक्के किंवा १२ टक्के मराठी आहे, बाकीचे सर्व बाहेरुन आलेत, आज त्या सर्वांना या मोर्चाने उत्तर दिलंय. आज अनेक लोक यात सहभागी झाले. मीरा भाईंदरमधील हा मोर्चा म्हणजे मराठी माणसाच्या एकीचा विजय आहे. तुम्ही सकाळपासून दीड हजार मनसे नेत्यांना आत टाकण्यात आले. त्यानंतरही रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात जर कार्यकर्ते उतरले असतील, तर ही लोकभावना आहे. यामुळे मीरा भाईंदरमधील स्थानिक आमदाराला इथला मराठी माणूस त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा अविनाश जाधव म्हणाले.
याला कोणताही दुजोरा देत नाही
“प्रताप सरनाईक यांच्यातील मराठी माणूस जागा झाला आहे, असं मला वाटतं. त्यामुळे ते बोलतात याबद्दल मला आनंद आहे. अशी कोणतीही गोष्ट घडली असेल तर ती योग्य नाही. मोर्चाचा आयोजक म्हणून मलाही ते आवडणार नाही. आम्ही हा मोर्चा काढता जर हा मोर्चा शांततेत काढता तर त्याला कोणतेही गालबोट लागू नये ही आमची जबाबदारी होते. अनेक लोक यात तुम्ही सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील कोणीतरी हे कृत्य केले असावे, याचे आम्ही समर्थन करत नाही. आम्ही याला कोणताही दुजोरा देत नाही”, असेही अविनाश जाधव म्हणाले.
पोलिसांनी मोर्चाचा मार्ग बदलण्यास सांगितलेले नाही
“आम्ही १० वाजता हा मोर्चा काढणार होतो. २ किमी चालून ११.३० पर्यंत हा मोर्चा संपला असता. पण रात्री ३ वाजता पोलिसांनी मला माझ्या कुटुंबाला उठवले आणि नंतर ते मीरा भाईंदरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी मला पालघरमध्ये शिफ्ट केलं. सरकारच्या मनात नेमकी भीती कसली हेच मला कळत नव्हते. मी पोलिसांनी मला जी काही वागणूक दिली, त्याबद्दल मी राज ठाकरेंकडे ही व्यथा मांडणार आहे. ज्यांना कोणाला मोर्चाचे श्रेय द्यायचे असेल त्याला द्यावे. पोलिसांनी आम्हाला मोर्चाचा मार्ग बदलण्यास सांगितला हे जे काही सांगतात ते अत्यंत खोटं आहे. मी काल पोलिसांसोबत बसलो होतो, त्यांनी मला मार्ग बदलण्याबद्दल काहीही सांगितले नाही. त्यांनी फक्त मला एकच सांगितलं की व्यापारी माफी मागायला येणार आहेत, तुम्ही ऐकणार आहात का? इतकंच त्यांचं मत होतं. त्यांनी मला कुठेही मार्ग बदला वैगरे सांगितलेले नाही. पोलिसांकडून जे काही सांगितले जातंय हे त्यांच्या अंगावर आलंय”, असा आरोप अविनाश जाधव यांनी म्हटले.
