सुसंस्कृत डोंबिवलीला कलंक, आमदाराच्या भावाने घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकेकाळी सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीची रात्रीची सुरक्षा धोक्यात आली आहे. मद्यधुंद तरुणांच्या गुंडगिरीमुळे येथील कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती समोर आली आहे. सत्ताधारी आमदाराच्या नातेवाईकाला आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप रात्री बंद ठेवावा लागला.

एकेकाळी सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीची प्रतिमा सध्या मलिन होत चालली आहे. डोंबिलवीत रात्रीच्या वेळी मद्यधुंद तरुण आणि गुंडगिरीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या शहरातील अराजकतेची ही समस्या इतकी वाढली आहे की, चक्क सत्ताधारी आमदाराच्या चुलत भावाला आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोल पंप रात्रभर बंद ठेवण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर-गणेश नगर परिसरात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे चुलत बंधू सुरेश मोरे यांचा पेट्रोल पंप आहे. मागील काही महिन्यांपासून रात्री ११ ते पहाटे ६ या वेळेत येथे मद्यधुंद तरुणांकडून कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ करणे, विनाकारण त्रास देणे आणि मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहे. या त्रासाला कंटाळून आणि कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे पंपचालक सुरेश मोरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
बॅनरवर लिहिलंय काय?
सुरेश मोरे यांनी आपल्या पंपाबाहेर एक मोठा बॅनर लावून आपली व्यथा मांडली आहे. पेट्रोल पंपाची वेळ ही सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत असेल. रात्रीच्या वेळेस दारू पिऊन काम करणाऱ्या मुलांना शिवीगाळ करणे, धमकी देणे या त्रासाला कंटाळून रात्री पंप बंद राहील, असे त्यांनी या बॅनरवर नमूद केले आहे. हा निर्णय अत्यंत गंभीर असल्याचे जनतेचे म्हणणं आहे. कारण सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्याच कुटुंबातील सदस्याला जर रात्रीच्या वेळेस पंप चालवण्यासाठी पोलीस संरक्षण मिळत नसेल किंवा स्थानिक गुंडगिरीचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, हे स्पष्ट होते.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
डोंबिवली शहर अनेक दशके मराठी साहित्य, कला आणि विचारवंतांचे केंद्र राहिले आहे. मात्र, सध्या रात्रीच्या वेळी वाढलेल्या या अराजकतेमुळे शहराच्या या सुसंस्कृत प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या रात्रीच्या गस्त आणि बंदोबस्तावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे शहरातील नागरिक रात्रीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहे.
