2 वर्षांपासून पोलिसांना चकवा, दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश अन् कोठडीत… शहापूरमध्ये नेमकं काय घडलं?
शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश ऊर्फ भाऊ दरोडा यांचे निधन झाले आहे. साकडबाव केंद्रातील भात घोटाळा प्रकरणी अटकेत असताना ही घटना घडली. या मृत्यूमुळे शहापूरच्या राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश उर्फ भाऊ दरोडा याचे दुर्दैवी निधन झाले आहे. हरीश दरोडा हा कोट्यवधी रुपयांच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता. अचानक न्यायालयात असताना त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण ठाणे जिल्हा आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रात झालेल्या दीड कोटी रुपयांच्या भात खरेदी घोटाळ्यात हरीश दरोडा हे मुख्य आरोपी होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात असतानाच हरीश दरोडा यांची प्रकृती अचानक ढासळली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आमदारांच्या सख्ख्या पुतण्याचा अशा प्रकारे अंत झाल्याने शहापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
२ वर्षांचा थरार आणि अटक नाट्य
साकडबाव केंद्रातील तब्बल ५ हजार क्विंटल भाताची अफरातफर केल्याप्रकरणी डिसेंबर २०२३ मध्ये किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घोटाळ्यानंतर हरीश दरोडा हे मागील २ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होते. कागदोपत्री फरार असलेले हरीश दरोडा अखेर ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहापूरमधूनच त्यांना अटक केली होती. विशेष म्हणजे, अटकेच्या काही काळ आधीच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात मोठ्या थाटामाटात पक्षप्रवेश झाला होता.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आदिवासी विकास महामंडळ हे गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. या प्रकरणात केवळ हरीश दरोडाच नव्हे, तर अनेक बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यावेळी शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या चलन पावत्या तयार करून शासनाची दीड कोटींची फसवणूक करण्यात आली. तसेच या प्रकरणात साकडबाव संस्थेचे सचिव संजय पांढरे, केंद्रप्रमुख जयराम सोगीर, जव्हारचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यासह इतर ६-७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या ३ वर्षांत शहापूर पट्ट्यात जवळपास १६ कोटींचे भात घोटाळे उघडकीस आले आहेत.
दरम्यान आमदार दौलत दरोडा यांच्यासाठी हा मोठा कौटुंबिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरीकडे पुतण्याचा कोठडीत झालेला मृत्यू, यामुळे शहापूरच्या राजकारणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.
