‘मोदी-ठाकरे एकत्र येणार’, रवी राणा यांचा मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा हादरे बसणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे खरंच काही घडतंय का? असा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून कालपर्यंत उद्धव ठाकरे हे लंडनच्या दौऱ्यावर गेल्याची टीका केली जात होती. तर आता रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकत्र येणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखी हादरे बसण्याचे बाकी असल्याचे संकेत मिळताना दिसत आहेत. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या फुटीनंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरी, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चित्रपटाचा मुख्य क्लायमेक्स अजून बाकी आहे, असंच काहीसं सध्याचं चित्र आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील बरेच राजकीय समीकरणं स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला चांगलं यश मिळालं तर येणाऱ्या सहा महिन्यात चांगलीच राजकीय पळापळ होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. असं असलं तरी दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे याबाबतच्या चर्चांवर आता महायुतीच्या नेत्यांकडून उघडपणे प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
रवी राणा नेमकं काय म्हणाले?
“मला माहिती आहे, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलले, संजय राऊत मोदींवर बोलले, मला दाव्याने सांगतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर 15 दिवसांत उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदींच्या सरकारमध्ये दिसतील. मोदींसोबत दिसतील. कारण येणारा काळच हा नरेंद्र मोदी यांचा असणार आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणं जरुरी आहे, हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे”, असा दावा रवी राणा यांनी केलाय.
‘ते आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं नाही’, शिरसाट यांची प्रतिक्रिया
रवी राणा यांच्या दाव्यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. “या जर-तरच्या भूमिका आहेत. त्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील. उद्धव ठाकरे यांनी यावं किंवा न यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांना घ्यावं की न घ्यावं हे उद्धव ठाकरे ठरवणारे नाहीत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी आहेत. इकडे एकनाथ शिंदे सुद्धा आहेत”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“पडद्यामागे आता हालचाली नाहीत. आता पडदा बाजूला गेलेला आहे. हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. त्या हालचाली सर्वसामान्य नागरिकांनाही थेट कळत आहेत. हालचाली सर्व पद्धतीने चालू आहेत. आता यांना त्या आघाडीत राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकत्र येणार की नाही यावर मी बोलणार नाही. पण निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींची वेळ मागितली होती”, असा मोठा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे मोदींवर व्यक्तीगत बोलले. त्यांना माफी मिळणार की नाही ते माहिती नाही. ज्याप्रकारे भाषणं झाले ते योग्य नव्हते. मोदींचं यश वैयक्तिक आहे. मोदींची सुप्त लाट महाराष्ट्रात असल्याने आम्ही लोकसभेत 41 जागा सुद्ध मिळवू. पडद्यामागे काय घडेल ते सांगता येत नाहीत. पण इथे शिवसेनेचं नेतृत्व हे एकनाथ शिंदेच करतील”, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.
