Weather Forecast : यंदा पाऊस कसा असणार? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितली आनंदाची बातमी; काय म्हणाले?
राज्यात पवासाचे वेध लागले आहे. असे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात यावेळी पाऊस कसा राहील याची माहिती दिली आहे.

Weather Forecast : राज्यात मुंबई, पणे तसेच इतर महत्त्वाच्या शहरापांसून ते संपूर्ण महाराष्ट्रात वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे वातावरणातील उष्णता काहीशी नाहीशी झाली आहे. गेल्या काही दिवसांत होत असलेल्या उन्हाच्या त्रासापासूनही काहीशी सुटका मिळालेली आहे. हा पाऊस झाल्यानंतर आता शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी करत आहेत. गाव-खेड्यात तशी तयारीही चालू झाली आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पाऊस कसा असेल? तसेच खरीप हंगामात पावसाचा अंदाज काय आहे? याची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस आज मुंबईत पत्रकार परिषदेत बलोत होते. त्याआधी राज्य सरकारची खरीप हंगामाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, कृषीराज्यमंत्री तसेच विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान विभागाचे अधिकारी, रेल्वेचे तसेच केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी नेमकं काय सांगितलं?
“खरीप हंगामाच्या अनुषंगाने हवामान खात्याने सुरूवातीला आम्हाला माहिती दिली. यावेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल असा त्यांचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा 7 टक्क्यांपासून 17 टक्क्यांपर्यंत महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये त्यांनी पाऊस सांगितलेला आहे. पावसाचा दोन दिवसांमधील खंड फार असणार नाही, असादेखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
हवामान अंदाजत काही बदल होऊ शकतो
तसेच हा अंदाज वर्तवताना हवामान खात्याने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पावसाचा तसेच हवामानाचा आमचा दीर्घकालीन अंदाज बरोबर येतो. परंतू कमी काळाचा हवामानाचा अंदाज यामध्ये काही बदल होऊ शकतो, असं हवामान विभागाने सांगितल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना एकूणच राज्यात यावेळी योग्य पाऊस पडेल, अशी अपेक्षा या वर्षी आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यात यावेळी आवश्यक तेवढा बियाणांचा पुरवठा आहे. तसेच आवश्यक तेवढा खत आहे. यात कुठलाही तुटवडा निर्माण होणार नाही, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली आहे. वारंवार बोगस बियाणांचे प्रकार बाहेर येतात. त्यामुळे महाराष्ट्राने यावेळी वेगळा प्रयोग केला आहे. केंद्र सरकारचे साथी हे एक पोर्टल आहे. या पोर्टलवर बियाण्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे रजिस्ट्रेशन स्ट्रेसेबल असतं. या बियाण्याचं उत्पादन कुठं झालं हे आपल्याला पाहता येतो. आम्ही केंद्र सरकारला ट्रुथफूल बियाण्याचीही या पोर्टलवर नोंदणी करावी अशी विनंती केली आहे. ही विनंती आता मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.