Marathwada Mukti Sangram Din : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष : तुम्हाला मराठवाड्याविषयी या गोष्टी माहीत आहेत का?
Marathwada Mukti Sangram Din : मराठवाडा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते बेरोजगारी, धार्मिक आणि जातीय संघर्ष, मागासलेपण परंतु या व्यतिरिक्तही मराठवाड्याची ओळख आहे.

भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वांतत्र्य मिळाले होते तर मराठवाड्याला 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वांतत्र्य मिळाले होते. म्हणजेच भारताच्या स्वांतत्र्यानंतर 1 वर्ष 1 महिन्यानी उशीरा… 15 ऑगस्ट 1947 पुर्वी तत्कालीन भारतात 350 पेक्षा जास्त संस्थाने होती. हैदराबाद संस्थान त्यापैकी एक होते आणि मराठवाडा प्रदेश हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 ला झाली होती. तेव्हा मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला होता. भौगोलिक दृष्ट्या विचार करावायचा झाल्यास मराठवाडा हा महाराष्ट्राच्या मध्यभागी येतो. मराठवाड्याच्या पुर्वेला विदर्भ, पश्चिमेला पश्चिम महाराष्ट्र, उत्तरेला खान्देश तर दक्षिणेला तेलंगाणा आणि कर्नाटक ही राज्ये येतात. एकूण 64,590 वर्ग किमी क्षेत्रफळासह 8 जिल्हे व त्यातील 76 तालुके मराठवाड्यात येतात. छत्रपती संभाजीनगर (पुर्वीचे औरंगाबाद) ही मराठवाडा विभागाची राजधानी…मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्याचे आपले असे वेगळे महत्व आहे. नाशिक जिल्ह्यातून सुरु होणारी गोदावरी नदी मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यातून वाहत पुढे तेलगांणा व आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करत बंगालच्या उपसागराला मिळते. त्यामुळे गोदावरी नदीला मराठवाड्याची गंगा समजतात व मराठवाडा हा गंगथडीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते.
पर्यटनाचा विचार करावायचा झाल्यास मराठवाड्यात अनेक धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत…मुख्यत्वे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणी, वेरूळ लेण्यांमधील बुद्ध लेण्या, कैलास मंदिर हा वास्तुकलेचा एक अद्भभुत नमुना समजल्या जातो, कन्नड तालुक्यातील पितळखोरा लेणी, दख्खनचा ताजमहाल म्हणून ओळखला जाणारा ‘बीबी का मकबरा’, पानचक्की, दौलताबादचा किल्ला, अंतुरचा किल्ला, शुलीभंजनचा किल्ला, वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर, शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंह यांची नांदेड येथील समाधी…शिख धर्माची देशभरातील जी पाच महत्वाची स्थळे आहेत त्यापैकी एक म्हणजेच नांदेडचा हुजुरसाहीब गुरुद्वारा…खुल्ताबाद परिसरात अनेक सुफी संताचा वावर राहिलेला आहे. हिंदु, मुस्लीम, बौध्द धर्मियांचे विविध धार्मीक स्थळे मराठवाड्यात आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीचे मंदिर तुळजापुरला आहे.
जगातील 173 देशात असलेल्या 1273 विविध वारसास्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात अजिंठा आणि वेरुळचाही सामावेश आहे.
मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. पैठणजवळील आपेगाव येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला तर पैठणमध्येच संत एकनाथांचा जन्म झाला. गंगाखेडमध्ये जन्मलेल्या संत जनाबाई, अंबाजोगाई येथील संत मुकंदराजाना मराठीतील आद्यकवी समजल्या जाते. हिंगोली जिल्ह्यात जन्मलेल्या संत नामदेवांनी तर भागवत धर्माची पताका उत्तर भारतात थेट पंजाबात फडकवली होती. नामदेवांच्या अभंगाचा सामावेश गुरु ग्रंथ साहीब मध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने पुणे जिल्हा आणि कोकण परिसरात होते मात्र शिवाजी महारांजाच्या वडिलांचे मूळ गाव वेरुळ होते. आजही वेरुळमध्ये शिवाजी महाराजांच्या आजोबांची म्हणजेच मालोजीराजे भोसलेंच्या गढीचे अवशेष बघायला मिळतात.
मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर हे येथील ऐतिहासिक गेटमुळे 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. शिवाय महाराष्ट्राची पर्यटन राजधानीचा मानही या शहराकडे आहे. आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्योगिक शहरापैकी एका शहराचा मान छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) च्या नावावर आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा शिक्का जालन्यावर बसलेला असला तरी बियाणांची राजधानी, स्टील उद्योगाची राजधानी, मराठवाड्यातील आर्थिक उलाढालीचे केंद्र हा मान मात्र जालना शहराकडे आहे. लातूरच्या मार्केट यार्डमधून देशभरातील तेलाचे विशेषत: सोयाबीन तेलाचे दर ठरतात
स्वांतत्र्यपूर्व कालखंडात मराठवाड्यातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी पुणे आणि हैदराबाद गाठावे लागायचे. 1950 साली स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनं फक्त मराठवाड्यातीलच नव्हे तर विदर्भातील बुलढाणा, खान्देशातील जळगाव, धुळे पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर (तत्कालीन अहमदनगर) जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली होती. पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत मोठा लढा दिला गेला. 16 वर्षांच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला. आपल्यापैकी अनेकजणांना ही बाब माहीत नसते की मुंबईनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठवाड्यावर विशेष प्रेम होते.
मराठवाड्याची खाद्य संस्कृती
मराठवाड्याची खाद्य संस्कृती ही एक विशेष बाब आहे. मराठवाड्यात ज्वारी, बाजरी, गहू आणि हरभरा ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ज्वारी किंवा बाजरीच्या गरम भाकरीसोबत झणझणीत पिठलं, भाजणीचे धपाटे आणि त्या सोबत दही हे विशेष प्रसिध्द आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. मांसाहाराचा विचार करावयाचा झाल्यास नान खलिया हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे तो खाण्यासाठी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरातच जावे लागेल. झणझणीत काळा रस्सा इथल्या मांसाहारी जेवणाची शान मानली जाते…काळ्या मसाल्यातील शेवग्याची भाजी , नांदेडची खिचडी, गंगापुरचा ज्वारीचा हुरडा, छत्रपती संभाजी नगर शहरातील तारा पान सेंटरचे तारा पान, धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरीचा पेढा व खवा हे विशेष प्रसिध्द आहे. कुंथलगिरीच्या खव्याला आणि पेढ्याला केंद्र सरकारचे भौगोलिक मानाकंन देखील (GI टॅग) मिळालेले आहे.
मराठवाडा आणि राजकारण
राजकीय दृष्ट्या मराठवाडा नेहमी महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहीला आहे. अत्यल्प काळासाठी का होईना मराठवाड्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला…तर सुंदरराव सोळंके आणि गोपीनाथ मुंडेंनी उपमुख्यमंत्रीपद भुषविले…राष्ट्रीय राजकारणाचा विचार करायचा झाल्यास शिवराज पाटील चाकुरकर पंजाबच्या राज्यपालपदी होते तर सध्या हरीभाऊ बागडे हे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत… शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकुरकर, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, सुर्यकांता पाटील, रावसाहेब दानवे पाटील केंद्रीय मंत्रिमडंळात मंत्री राहिलेले आहेत. मराठवाड्याला नेहमी सामाजिक आणि राजकीय विषयांची प्रयोगशाळा समजल्या जाते. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला प्रभावित करणारे विविध राजकीय प्रयोग मराठवाड्याच्या भूमीत झाले आहेत.
