लव्ह के लिए साला कुछ भी करेगा ! गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी ‘भन्नाट’ आयडिया ! एसी लोकल..
प्रेमापोटी प्रियकराने आपल्या मैत्रिणीसाठी एसी लोकलचा बनावट पास तयार करून दिला. त्यासाठी खोटा यूटीएस ॲप तयार केला. तिकीट तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. वांद्रे पोलिसांनी प्रियकर आणि त्याची मैत्रीण यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई लोकलमध्ये बनावट पासचा हा प्रकार धक्कादायक असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. एखादी व्यक्ती प्रेमात पडली की त्यासाठी ती काहीही करू शकते. आपल्या प्रेयसीला चांद-तारें तोडून आणून देण्याची भाषा करणारे अनेक प्रियकर आपण पाहिलेत, मोठ्या पडद्यावरही अशी अनेक वचनं प्रेयसीला त्यांचे प्रियकर देताना दिसले. पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या प्रेयसीसाठी भवन्नाट आयडिया करून तिला एसी लोकलचा बनावट पास तयार करू देणाऱ्या एका भामट्या प्रियकराची आयडिया पाहून मात्र पोलीसही थक्क झाले. पण कानून के हात लंबे होते है या न्यायाने अखेर फसवणूक करणाऱ्या त्या इसमाविरोधात आणि त्याच्या मैत्रिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसी लोकलचा बनावट पास आणि त्यासाठी बनावट यूटीआय ॲप तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी दोघांविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
नेमकं काय झालं ?
लोकलचे बनावट तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वे मार्गावर फसवणुकीच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे टीसींनी ( तिकीट तपासनीस) अशा बनावट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम तीव्र केली असून शुक्रवारी चर्चगेट-विरार लोकल मार्गावर या तपासणीदरम्यान एक बनावट लोकल तिकीट (यूटीएस पास) टीसींनी पकडलं. जलद चर्चगेट लोकलमधील महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात दीपिका मूर्ती तिकीट तपासत होत्या. तेव्हा एका तरूणीने त्यांना मोबाईलवरचा पास दाखवला. त्याची मुदत 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 होती.
मात्र ते पाहून तिकीट तपासनीस मूर्ती यांना थोडं संशयास्पद वाटलं. त्यांनी ती प्रवासी महिला प्रीती हिच्याकडे विचारणा केली. पण तिने नीट न सांगता, उडवाउडवीची उत्तरं दिली. ज्यामुळे टीसीचा संशय आणखीनच वाढला. म्हणून पुढील तपासणीसाठी त्यांनी तिला वांद्रे येथे उतरवलं आणि डीसीटीआय कंट्रोलद्वारे तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिच्या मोबाईलवर असलेला यूटीआय पास हाँ खरा नसून खोटा, बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ते पाहून अनेकांना धक्का बसला. त्या महिलेला खडसावण्यात आल्यावर अखेर तिने तो पास खोटा असल्याचे आणि एका मित्राने बनवून दिल्याचं कबूल केलं. त्याने तिला व्हॉट्सॲपद्वारे एक बनावट यूटीएस ॲप्लिकेशन पाठवल्याचंही तिने सांगितलं, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हे प्रकरण उघडकीस आल्यावर त्यांनी ती प्रवासी महिला आणि बनावट ॲप तयार करणारा तिचा अभियंता मित्र अनुज गुप्ता या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वांद्रे पोलिस याप्रकरणात आणखी तपास करत आहेत.
