Sanjay Raut : महापालिका जिंकण्यासाठी वॉर्ड फोडले जातील, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका निवडणुका लवकर घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रभाग रचनेत गैरप्रकार होऊ शकतात असे सांगत, गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निष्पक्ष निवडणुकीची मागणी केली आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आदित्य आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त वाढदिवस शुभेच्छांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणूकांसाठी तीन टप्प्यात प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून येत्या ऑक्टोबरमध्ये या निवडणूका होण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेबाबत आयोगाने आदेश दिला, पण प्रभाग रचना करणारे अधिकारी, सरकार आणि निवडणूक आयोग यावर कुणाचाही विश्वास नाही असे राऊत म्हणाले. आपल्याला सोयीचे ठरतील अशा पद्धतीने वॉर्ड फोडले जातील, प्रभाग रचना केल्या जातील आणि निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल,असा आरोप संजय राऊत यांनी केला.
अधिकाराचा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे
सोयीचे ठरतील अशा पद्धतीने वॉर्ड फोडले जातील, प्रभाग रचना केल्या जातील आणि निवडणुकीत आपल्याला फायदा मिळवला जाईल, या पद्धतीने काम करणारे सरकार आहे. पैशाची ताकद प्रचंड आहे. प्रशासनात दहशत निर्माण केली जाईल, हे सत्य आहे. विरोधी पक्षाने असा आक्षेप घेतला असेल तर गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं राऊत म्हणाले. निष्पक्षपाती पद्धतीने हे काम झालं पाहिजे. त्यासाठी आयोगाने जागल्याची भूमिका घेतली पाहिजे. अधिकाराचा गैरवापर तर होणार नाही ना हे पाहिलं पाहिजे. महापालिकेचं खातं एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. अशा बाबतीत ते काही सरळ गृहस्थ नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं. परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. अमित शाह यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे. त्यामुळे अमित शाह आणि त्यांचा पक्ष आहे, एसंशि, ते मुंबई मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातील अशी टीका करतानाचा आम्ही ते होऊ देणार नाही असा इशाराही राऊतांनी दिला.
उगाच वेगळा अर्थ काढू नये
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे 13 तर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुंबईत तसेच ठाण्यातही एकाच बॅनरवर फोटो लावून त्यांना एकत्र शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मनसे-शिवसेना युतीच्या चटर्चा सुरू असतानाच आदित्य आणि राज यांच्या एकत्र फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना सवाल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ‘ एकमेकांचे नातेवाईक असलेल्या दोन नेत्यांना लोकं वाढदिवसाच्या शुभेच्छादेत असतील तर मीडियाला त्यात शंका घेण्याचं कारण नाही. प्रश्न विचारण्याचं कारण नाही. कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात. कुटुंबापेक्षा कार्यकर्ते नेत्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या त्यांच्या भावना आहेत’ असं राऊत म्हणाले.
राज ठाकरेंना आमचे कार्यकर्ते शुभेच्छा देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे ती. अन्य नेत्यांच्या होर्डिंगवर अनेक नेत्यांचे फोटो असतात. शुभेच्छा देण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही. मीडियाने यात उगाच वेगळा अर्थ काढू नये, असा टोलाही राऊतांनी लगावला.
