Mumbai: गणेश विसर्जनासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त, सुरक्षेसाठी CCTV व ड्रोनसह पहिल्यांदाच AI चाही वापर होणार
उद्या मुंबईसह संपूर्ण देशात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या काळात मुंबई पोलिसांकडून सुरक्षेची खास खबरदारी घेण्यात येत आली. मुंबईत हजारो पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांची तैणात करण्यात आली आहे.

उद्या (6 सप्टेंबर) अनंत चतुर्दशी आहे. उद्या मुंबईसह संपूर्ण देशात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या काळात मुंबई पोलिसांकडून सुरक्षेची खास खबरदारी घेण्यात येत आली. मुंबईत हजारो पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांची तैणात करण्यात आली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआयच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. उद्या शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
1 ते दीड लाख गणेश मूर्तींचं विसर्जन होणार
मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी म्हटले की, उद्या अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तयारी केलेली आहे. हा उत्सव राज्योत्सव म्हणून सरकारने घोषित केलेला आहे. उद्या 6 हजार 500 सार्वजनिक गणेश मूर्तीचं आणि जवळपास एक ते दीड लाख घरगुती मूर्तींचे विसर्जन आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक मूर्तीच्या विसर्जनासाठी चौपाट्या तयार आहेत. चौपाट्यांवर लाइफ गार्ड, मुंबई पोलीसंचा बंदोबस्त आहे.
हजारो अधिकारी-कर्मचारी तैणात
गणेश विसर्जानासाठी 12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 डीसीपी आणि 61 एसीपी सोबतच 3 हजार अधिकारी आणि 18 हजार कर्मचारी, 14 एसआरपीएफ आणि क्यूआरटी पथके तैणात आहेत. 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाणार आहे. बिट मार्शल, निर्भया पथक आणि साध्या वेधातले पोलिसही तैनात असणार आहेत. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात लोकांनी साजरा करावा, मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सत्यनारायण चौधरी यांनी केलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत म्हटले की, आजपर्यंत गणेशोत्सवाला कधीच बाप्पाच्या कृपेनं गालबोट लागलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबच आढावा बैठक घेतली होती. यंदा सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण केला आहे. सेन्सेटिव्ह भागात आपण एआयचा वापर केला आहे. अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांना धमकी मिळाली होती, यावर बोलताना कदम म्हणाले की, मुंबई पोलीस अलर्ट असतात, आपली इंटेलिजन्स अॅक्टीव्ह आहे. सोर्स शोधणं सुरु आहे, घाबरुन जाण्याचं कारण नाही.
