शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात; ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ पोस्टचा उल्लेख
Shivsena MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज होत आहे. यावेळी आमदार सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी ठाकरे गटाकडून शिवसेनेत फूट पडली तेव्हाच्या 'त्या' पोस्टचा संदर्भ देण्यात आला. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
मुंबई| 21 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होत आहे.विधानसभा अध्यक्षस राहुल नार्वेकर यांच्या पुढे ही दोन्ही गटाकडून बाजू मांडली आहे. या सुनावणी दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले गेले आहेत. आज दिवसभर ही सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे.
ठाकरे गटाची ‘ही’ मागणी
ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, सुनील प्रभू हे नेते या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला उपस्थित आहेत. सर्व युक्तिवाद आणि आक्षेपांचे व्हीडिओ रेकॉर्डिंग करावं, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली आहे.पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळली आहे. सर्व युक्तिवाद आणि आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला.
सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवताना काय घडलं?
सुनील प्रभू यांनी सादर केलेल्या पुराव्यांची माहिती ठाकरेंचे वकील देवदत्त कामत देत होते. शिंदे गटाच्या वकील महेश जेठमलानी यांनी याला आक्षेप घेतला. सुनील प्रभू यांनी माहिती द्यायला हवी, असं महेश जेठमलानी म्हणाले. सुनील प्रभू हे मराठीमध्ये आपली साक्ष देतील ते ट्रान्सलेट करण्यासाठी वेळ जाईल, असं कामत यांच्याकडून सांगण्यात आलं. यात सुनावणीचा वेळ जात असल्याच कामत म्हणाले. सुनील प्रभू हे साक्षीदार आहेत आणि ठाकरे गटाचे वकील त्यांना डिक्टेकट करत आहेत, असा आक्षेप शिंदे गटाकडून घेण्यात आला. त्यावर मी दुपारनंतर मी साक्षीदाराला वेगळीकडे बसण्याची व्यवस्था करेन, असं अध्यक्ष म्हणाले.
विटनेस बॉक्स बसवला
विधानसभेत होत असलेल्या या सुनावणीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यासाठी विटनेस बॉक्स आणण्यात आला आहे. सकाळी एका टप्प्यातील सुनावणी पार पडली. तर आता सुरू झालेल्या या दुसऱ्या सत्रातील सुनावणीसाठी विधानसभेत विटनेस बॉक्स लावण्यात आला आहे.