Lockdown : अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ

कुख्यात गँगस्टार डॉन अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ करण्यात आली (Gangstar Arun Gawali) आहे.

Lockdown : अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ

मुंबई : कुख्यात गँगस्टार डॉन अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ करण्यात आली (Gangstar Arun Gawali) आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (11 मे) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी केली. सुनावणीसाठी यावेळी अरुण गवळी मुंबईतून (Gangstar Arun Gawali) हजर होता.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 13 मार्च रोजी 45 दिवसांची पॅरोलची रजा दिली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार गवळीला 27 एप्रिलला तुरुंगात हजर व्हायचे होते. मात्र देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अरुण गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी करत नागपूर खंडपाीठाने 14 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 10 मे पासून पुढील 14 दिवस ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

पत्नीच्या आजारपणाचे कारण पुढे करून मागील काही वर्षांमध्ये अनेकदा अरुण गवळीने पॅरोलवर रजा घेतल्या आहेत. अरुण गवळी याआधीही 3 ते 4 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचं लग्न, आजारपण अशी कारणं देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता.

नुकतेच 8 मे रोजी अरुण गवळीच्या धाकट्या मुलीचे दगडी चाळीत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्नपार पडले. गवळीची मुलगी योगिताचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेसोबत झाले आहे. लॉकडाऊनचे नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न पार पडलं.

काय आहे कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी 30 लाखांची रक्कम मागितली.

सदाशिवने 30 लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली. अरुण गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसंडेकरांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितलं. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या साथीदाराकडे दिलं. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी प्रत्येकी 20 हजार रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार गिरीने अशोक कुमार जयस्वार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसंडेकरांवर लक्ष ठेवलं. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने पकडण्यात आलं. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.

संबंधित बातम्या :

दगडी चाळीत डॅडीची क्वीनवर नजर, लॉकअपमधून बाहेर, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अरुण गवळीचा ‘कॅरम’गेम

दगडी चाळीत डॅडीची दानत, पॅरोलवर बाहेर आलेल्या अरुण गवळीची गरजूंना मदत

अरुण गवळीच्या मुलीचा विवाह, कन्यादान करताना ‘डॅडी’ भावूक

Published On - 2:02 pm, Mon, 11 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI