राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक वादळी ठरणार? मनोज जरांगेंसह मराठी सक्तीवरून खडाजंगीची शक्यता, शिंदे सेनेचा नाराजीचा सूर?

Cabinet Meeting Today: आजची कॅबिनेट बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेची नाराजी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत समोर येण्याची शक्यता आहे. काय आहे मोठी अपडेट?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक वादळी ठरणार? मनोज जरांगेंसह मराठी सक्तीवरून खडाजंगीची शक्यता, शिंदे सेनेचा नाराजीचा सूर?
राज्य मंत्रिमंडळ बैठक
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 7:42 AM

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मराठी भाषा सक्तीची मुदत वाढ यावरून नाराजी नाट्य रंगू शकते. कॅबिनेटच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे कूच करण्याच्या आवाहनाची चर्चा होऊ शकते. तर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. तर आज कॅबिनेटमधील धडाकेबाज निर्णायाकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. आजच्या बैठकीत धडाकेबाज निर्णयाकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे. डीजेवर बंदीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत. राज्यात डीजेविरोधात नाराजीचा सूर आहे. पुण्यात डीजेवर बंदी घालण्याची मागणी समोर आल्यानंतर जनतेतून त्याला मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसून येते. आगामी गणपती उत्सव पाहता आजच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची आणि एक धडाकेबाज निर्णय होण्याची शक्यता आहे.

याशिवाय मराठवाड्यासह राज्यातील काही भागात दुष्काळाचे सावट गडद होत आहे. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. शेतकरी कर्जमाफीविषयी पुढील प्रक्रिया आणि उर्वरीत शेतकऱ्यांना लाभ याविषयी आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण केले होते. राज्य सरकारने त्यांना अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याविषयी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यासंदर्भात आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ग्रामस्तरीय, जिल्हास्तरीय वनहक्क समिती गठीत करण्याविषयीचा निर्णय होऊ शकतो.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मुद्दा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीत प्रतिसाद मिळत आहे. तर मराठा समाजाच्या न्याय मागण्याविषयी आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे पाटील यांच्याशी चर्चेची दारं उघडी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर जरांगे पाटील यांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकार पुन्हा शिष्टमंडळ पाठवण्याची शक्यता आहे.

मराठी भाषा सक्तीचा मुद्दा गाजणार

मुंबईत टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांना मुदतवाढ देऊनही त्यातील अनेकांनी आडेमुठेपणा दाखवला. त्यांनी जुजबी मराठी बोलण्यासह नकार दिला. मुंबईत उदरनिर्वाह करुनही मराठी भाषेला त्यांनी नकारघंटा दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाद वाढू नये यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ दिली. त्यानंतर मराठी भाषिकांना डिवचणारा जल्लोष मुंबईत काही ठिकाणी साजरा झाला. यावरून खडाजंगी उडण्याची शक्यता आहे.

Follow Us