शिवसेनेला 3 दिवसांनंतर जाग, आदित्य ठाकरेंकडून गोरेगाव घटनेची दखल

मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे दीड वर्षांचा दिव्यांश उघड्या गटारात पडून 3 दिवस झाले आहेत. मात्र, शिवसेनेला 3 दिवसांनंतर जाग आली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही घटना दु:खद असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेला 3 दिवसांनंतर जाग, आदित्य ठाकरेंकडून गोरेगाव घटनेची दखल


मुंबई: मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे दीड वर्षांचा दिव्यांश उघड्या गटारात पडून 3 दिवस झाले. यानंतर शिवसेनेला जाग आल्याचे दिसत आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोरेगावची ही घटना दु:खद असल्याचे म्हटले. तसेच या घटनेला कोण जबाबदार आहेत याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.

आदित्य ठाकरे म्हणाले, “ही घटना खरंच दु:खद आहे. ही घटना कशामुळे घडली? याची चौकशी होणे गरजेचे आहे. गटारे, मॅनहोल्स बंद असायला हवीत. त्यांच्यावर जाळी असायला हवी. त्या ठिकाणी गटार बंदही नव्हते आणि जाळीही नव्हती. त्याची चौकशी करुन ती कुणामुळे आणि का घडली याचा तपास झाला पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी.”

या घटनेनंतर याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची असून महापौरांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर बोलताना ठाकरे यांनी या गोष्टीचे राजकारण करायला नको, असे म्हटले. ते म्हणाले, “ही गोष्ट किती राजकीय करायची हा वेगळा मुद्दा आहे. चौकशी झाल्यानंतर जबाबदार व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण यामुळे केवळ त्या मुलाचाच नाही तर आपलाही जीव जाऊ शकतो. आपण सर्व देखील फिरत असतो. आपण ट्विटर पाहत आहोत की मॅनहोल्स आणि कचऱ्याविषयीच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना चुकून झाली की मुद्दाम याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे.”

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या घटनांना मुंबईकरांनाच जबाबदार धरले होते. यावर ठाकरे म्हणाले, “नेमकं कोण जबाबदार याची चौकशी झाली पाहिजे. महापौरांकडे काही माहिती असेल, अधिकाऱ्यांकडे काही माहिती असेल तर ती घेऊन पुढे आले पाहिजे. आता बोलून कुठल्या निष्कर्षांपर्यंत येणे मला योग्य वाटत नाही. मुंबईच्या देखरेखीची जबाबदारी आमच्यावर आहे.”

काय आहे प्रकरण?

10 जुलैच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळच्या आंबेडकर चौकात आईसोबत दीड वर्षाचा चिमुकला दिव्यांश सिंह दुकानात आला होता.  खेळता खेळता दिव्यांश रस्त्यावर आला. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठी वळत असताना पाय घसरुन तो नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडला. त्याची दृश्य शेजारीच असलेल्या मशिदीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि कुटुबीयांचा आक्रोश सुरू झाला. त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला.

उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या  दिव्यांशचा (Divyansh Singh) शोध आता थांबवण्यात आला आहे. 60 तास उलटून गेल्यानंतरही दिव्यांशचा शोध न लागल्याने दिव्यांशचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. त्यांनी याला मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर जबाबदार  असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी आज आंदोलनही करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI