दादरमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरु, पार्किंगचीही सुविधा, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

दादरमधील प्लाझा चित्रपट गृहानजिक आणि मनपाच्या जी उत्तर विभाग कार्यालयाजवळ असणाऱ्या मनपा सार्वजनिक वाहनतळातील दुसऱ्या मजल्यावर EV चार्जिंग स्टेशनची सुविधा आजपासून सुरु करण्यात आली आहे.

दादरमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरु, पार्किंगचीही सुविधा, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : “पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (E.V.) ही काळाची गरज असून, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक वाहनतळांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अधिक असलेल्या परिसरांमध्ये इ. व्ही. चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करणे गरजेचे आहे. या दृष्टीने अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करुन अधिकाधिक सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करुन द्यावी”, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. ते आज दादर (पश्चिम) परिसरातील मनपा सार्वजनिक वाहनतळामध्ये उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण करतेवेळी बोलत होते. विशेष म्हणजे आज लोकार्पित करण्यात आलेले चार्जिंग स्टेशन हे सार्वजनिक वाहनतळांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले राज्यातील पहिले ‘इ. व्ही. चार्जिंग स्टेशन’ आहे. (Aditya Thackeray inaugurates charging station for electric vehicles in Dadar)

दादर (पश्चिम) परिसरातील प्लाझा चित्रपट गृहानजिक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाजवळ असणाऱ्या मनपा सार्वजनिक वाहनतळातील (कोहिनूर) दुसऱ्या मजल्यावर इ. व्ही. चार्जिंग स्टेशनची सुविधा आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार सदा सरवणकर, आमदार मनिषा कायंदे, स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर, माजी महापौर व नगरसेविका श्रद्धा जाधव, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते. आज लोकार्पित करण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी पार्किग आणि चार्जिग ही सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा उपलब्ध होण्यासह इलेक्ट्रिक वाहनांद्वारे प्रवास करुन मुंबई शहरात येणाऱ्या नागरिकांना देखील एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

पार्किंग आणि चार्जिंग एकाच ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या या चार्जिंग स्टेशनमध्ये एकावेळी 7 इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापैकी 4 ‘चार्जर’ हे जलद चार्जर असून, या प्रत्येक चार्जरद्वारे साधारणपणे एका तासात एक वाहन, याप्रमाणे एका तासात एकावेळी 4 वाहने ‘चार्ज’ करता येऊ शकतात. तर, या व्यतिरिक्त 3 चार्जर हे संथ चार्जर (स्लो चार्जर) या प्रकारातील असून, याद्वारे 1 वाहन चार्ज करण्यास साधारणपणे 6 तासांचा कालावधी लागतो. या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी प्रती युनिट रुपये 15/- इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे चार्जिंग स्टेशन आठवड्याचे सातही दिवस 24 तास (24 x 7) नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती या निमित्ताने सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

इतर बातम्या

शानदार फीचर्ससह टाटा मोटर्सची सर्वात छोटी SUV लाँचिंगसाठी सज्ज, Creta, Seltos ला टक्कर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

(Aditya Thackeray inaugurates charging station for electric vehicles in Dadar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI