ठाकरे गटाचं अखेर ठरलं… आदित्य ठाकरे जाणार दीपकेंच्या मोर्चात, सरकारला टेन्शन? मोठ्या घडामोडींना वेग
आदित्य ठाकरे हे अभिजीत दीपके यांच्या मोर्चात सहभागी होणार असल्याने सरकारला मोठा राजकीय तणाव जाणवत आहे. ठाकरे गट, शरद पवार गट आणि राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाची धार वाढली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादने दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मात्र, ठाकरे गट केवळ पाठिंबा देऊन थांबलेला नाही तर आदित्य ठाकरे हे दीपके यांच्या मोर्चात खांद्याला खांदा लावून सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे केवळ राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मोर्चाबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीजेपीचं आंदोलन शिवाजी पार्कातच होईल. काही भाजपचे बुंदीचे लाडू रस्त्यावर उडत होते. पण फुटले नाहीत. शिवाजी पार्कात असे बुंदीचे लाडू उडत असतात. सीजेपीचं आंदोलन तिथेच होणार आहे. मी काल आदित्यला विचारलं ते जेनजीत येतात का? तर त्यांनी 1997 नंतर जन्मलेले सर्व जेनजीमध्ये येतात. मीही त्यात बसतो. त्यामुळे मी आंदोलनात सहभागी होणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
गर्जना मोर्चा
राऊत यांनी यावेळी इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीवरही प्रतिक्रिया दिली. कालच्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत 4 तारखेच्या मोर्चाची माहिती दिली. मुंबईत भव्य स्वरुपात आंदोलन होणार असल्याचं सांगितलं. हा गर्जना मोर्चा असणार आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी ही महाराष्ट्राची गर्जना असेल. ज्या महाराष्ट्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले, त्या महाराष्ट्रातून संविधान वाचवण्यासाठी गर्जना होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मोर्चाची तयारी करत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. डावे पक्षही या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.
आधी तुमची बंडाळी पाहा
इंडिया आघाडीच्या बैठकीला डीएमके आणि आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी नव्हते. त्यावरून केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी टीका केली होती. त्याचाही राऊत यांनी समाचार घेतला. डीएमके बैठकीला आली नाही. त्यामुळे ते भाजपसोबत आहे असं होत नाही. आम आदमी पक्षही काल बैठकीला नव्हता, याचा अर्थ ते भाजपसोबत आहेत असं नाही. स्थानिक राजकारणामुळे दोन्ही पक्ष बैठकीला आले नाही. पण भाजपने त्याची चिंता करू नये. भाजपने त्यांच्या पक्षात सुरू असलेल्या बंडाळीकडे पाहावे, असा टोला राऊत यांनी लगावला.
