वसईतून 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

वसईतून 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

मुंबई : वसईच्या चिंचोटी परिसरातून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं. अजय आणि साईनाथ डेअरी येथून हे भेसळयुक्त पनीर जप्त करण्य़ात आलं आहे. पालघर पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्या विशेष पथकाने छापेमारी करुन 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं आहे. सध्या या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

बुधवारी पालघर पोलीस अधिक्षक गौरव सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रतिबंधक विभागाने चिंचोटी कामण रोडवर असलेल्या अजय आणि साईनाथ या दोन डेअरींवर छापा टाकला. यावेळी येथे पनीर बनवण्यासाठी अन्न सुरक्षा आणि दर्जात्मक नियमांचे पालन होत नसल्याचं आढळून आलं. त्यानंतर पथकाने या डेअरींमधून अंदाजे 2 हजार 500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं. यापैकी अजय डेअरी येथून 700 किलो तर साईनाथ डेअरीमधून 1800 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या पनीरची किंमत 7 लाख 50 हजार रुपये असल्याची माहिती आहे.

साईनाथ डेअरीमध्ये तयार होणाऱ्या पनीरमध्ये सर्व उपयुक्त सामुग्री वापरली जात असली, तरी त्याठिकाणी अन्न सुरक्षा आणि दर्जात्मक नियमांचे पालन होत नसल्याचं समोर आलं. तर त्याच्याच बाजूला असलेल्या अजय डेअरीमध्ये सर्वच पनीर हे दुर्गंधीयुक्त परिसरात बनवलं जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अजय डेअरीला बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Published On - 9:22 am, Thu, 14 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI