
Vijay Vadettiwar on Land Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कथित जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे. मुंबईत शिंदे सेनेच्या एका मंत्र्यांने मोठा जमीन घोटाळा केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. मिरा भाईंदरमध्ये 200 कोटींची जमीन मंत्रिमहोदयांनी अवघ्या 3 कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या ताज्या आरोपाने सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहे. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी समिती गठीत करणे, अहवाल मागवणे अशी रुटीन प्रक्रिया करण्यात येत आहे. पण खमकी कारवाई करण्याचा कोणताही इरादा सरकारने अद्याप दाखवलेला नाही.
प्रताप सरनाईकांवर तोफ गोळा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळा केल्याच्या आरोप केला आहे.ज्या जमिनीवर प्रताप सरनाईक यांच्यावर घोटाला केल्याचा आरोप आहे ती जमीन मीरा भाईंदरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या जमिनीचा बाजारभाव 200 कोटी रुपये असून ती अवघ्या 3 कोटी रुपयांत सरनाईकांनी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बोगस मतदार कुठल्याही परिस्थितीत रोखू
राज्य निवडणूक आयोगाने न. प. निवडणुकांसाठी तयार केलेली मतदार यादी सदोष आहे. ज्यांची वयाचे 18 वर्षे पूर्ण झाले आहे. त्यांनाही संधी देणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसत नाही.याशिवाय दुबार आणि बोगस मतदारांचाही प्रश्न आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत बोगस मतदान रोखू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली.
विरोधी पक्षांची मोट बांधत आहोत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी संघटना, उबाठा -शिवसेना, बसपा यासह विरोधी पक्षाची मोट बांधून भाजपला हरवण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कमिशन खोरी 20 टक्क्यांच्या वर गेली आहे. नागरी समस्या आवासून उभ्या आहेत. अशा स्थितीत आम्ही विरोधी पक्ष म्हणून निवडणुकांना सामोरे जात विजयी होऊ असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
12 आणि 13 तारखेला न. प. च्या उमेदवारांची यादी जाहीर करू
चंद्रपुरात नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडी बाबत सविस्तर बैठक घेत चर्चा केली आहे. न. प. सदस्य पदासाठीची नावे निश्चित झाली असून आता थेट नगराध्यक्ष पदासाठीची चर्चा सुरू आहे. 12 आणि 13 तारखेला अंतिम यादी जाहीर करू अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.