
राजकीय पटलावर घडामोडींना वेग आला आहे. एका पाठोपाठ राजकीय भेटींमुळे चर्चांना उधाण आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. चर्चेतील मुद्दे काही असोत पण बंद दरवाजा आड काय चर्चा झाली यावर खल सुरू झाला आहे.
अमित ठाकरे-आशिष शेलार भेट
राज ठाकरे यांनी काल पार्किंग आणि शहर नियोजन याविषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दोघांनी याविषयावर दीर्घ चर्चा केली. तर त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यांनी मुद्दे मांडले. काही मागण्या त्यांनी केला. गणेशोत्सव काळातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकल्याव्यात अशी मागणी अमित ठाकरेंनी केली. त्यानंतर सर्व पदाधिकारी बाहेर आले आणि आशिष शेलार आणि अमित ठाकरे यांच्यात स्वतंत्र चर्चा झाली.
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
याप्रकरणी मनसेने सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना एक निवेदन दिले. त्यात ‘गणेशोत्सव’ हा राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. यंदाचा गणेशोत्सव हा विविध योजना आणि उपक्रमांसह राज्यभरात मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना या महोत्सवात सक्रिय सहभाग घेता येणार आहे. पण याच काळात काही अभिमत विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे व राज्यातील काही महाविद्यालयांनी गणेशोत्सव कालावधीत परीक्षेची वेळापत्रके जाहीर केली आहेत. हे वेळापत्रक जाहीर करणे हे शासनाच्या जाहीर धोरणाशी विसंगत असून विद्यार्थ्यांच्या उत्साहावर पाणी फेरण्यासारखं असल्याचं मनसेने म्हटलं आहे. या काळात परीक्षांचे आयोजन करणे म्हणजे विद्यार्थ्यांना या महोत्सवापासून वंचित ठेवणे असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत (गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी) कोणत्याही परीक्षांचे आयोजन करता कामा नये. तसेच, या कालावधीत ज्या परीक्षा निश्चित करण्यात आल्या असतील त्या तात्काळ रद्द करून पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच संबंधित महाविद्यालये, विद्यापीठांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्यभरात कुठेही गणेशोत्सव काळात परीक्षा होऊ देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला.
राजकीय चर्चा झाली नाही
दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली. त्यावर अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. आमचे आधीपासून जुने सबंध आहेत त्यामुळे दोघांमध्ये फक्त खाजगी चर्चा झाली राजकीय चर्चा अजिबात झाली नाही असे ठाकरे म्हणाले. टीका होतात त्या फक्त राजकीय टीका होतात वैयक्तिक टीका होत नाहीत, असे त्यांनी शेलार यांच्यावरील टीकेसंदर्भात म्हटले.