गृहमंत्री म्हणाले, आयुष्यात असं वर्ष पाहिलं नाही, आरोग्य मंत्री म्हणतात, मानव जातीवर संकट!

आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थाची सुविधा कशाप्रकारे असेल, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या प्रतिक्रियेत माहिती दिली (Anil Deshmukh and Rajesh Tope on year 2020).

गृहमंत्री म्हणाले, आयुष्यात असं वर्ष पाहिलं नाही, आरोग्य मंत्री म्हणतात, मानव जातीवर संकट!

मुंबई : 2020 या वर्षाचा आज शेवटचा दिवस. या वर्षात प्रत्येकाने भरपूर संकटांशी सामना केला. आगामी वर्ष चांगलं जावं, अशी सर्वांची आशा आहे. 2020 या वर्षांतील कोरोना संकट, या संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजना आपण सगळ्यांनी पाहिल्या. कोरोना संकट अद्यापही ओसरलेलं नाही. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थाची सुविधा कशाप्रकारे असेल, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत माहिती दिली (Anil Deshmukh and Rajesh Tope on year 2020).

‘आयुष्यात असं वर्ष पाहिलं नाही’

“आयुष्यात कधीच पाहिले नाहीत असे प्रसंग 2020 सालातील या कोरोना संकट काळात बघायला मिळाले. सर्वकाही बंद, अशी परिस्थिती होती. लॉकडाऊन झाल्याने सर्व व्यवहार बंद झाले. सर्व ठप्प झालं होतं”, असं अनिल देशमुख म्हणाले.

“नाईलाजानं लॉकडाऊनचा‌ निर्णय घ्यावा लागला. पण लोकांनी सहकार्य केलं. राज्यातील कायदा‌ आणि सुव्यवस्था‌ नीट‌ ठेवता‌ आली, कारण लोकांनी सहकार्य केलं. त्यामुळे यासाठी लोकांचं कौतुक करावं लागेल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“नवीन वर्षात पोलिसांच्या घराचा‌प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचा‌ आमचा‌ प्रयत्न असणार‌ आहे. पोलिसांना त्यांची घरं नीट राहिली तर त्यांची कार्यक्षमता वाढू शकते. आगामी नव्या वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेची‌ परिस्थिती नीट राहावी कोरोनाचं संकट‌ पुढच्या वर्षभरात टळावं हीच अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली (Anil Deshmukh and Rajesh Tope on year 2020).

‘मानव जातीवर संकट’

“हे वर्ष आव्हानात्मक होतं. जगाच्या दृष्टीनं मानव जातीवर हे मोठं संकट होतं. या वर्षात आपल्याला या मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. कोरोना संकट काळात सरकार आणि प्रशासनानं खबरदारी घेतली. कधी नव्हे ते लॉकडाऊन करावं लागलं. मला आरोग्यमंत्री म्हणून कोरोनाचं आव्हान मोठं होतं. सरकारकडून चांगलं नियोजन केलं गेलं. अनेक ठिकाणी मोठ‌मोठी‌ हॉस्पिटल्स उभारली गेली”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.

“नव्या वर्षात आरोग्याची सेवा चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आहे. पुढील काही महिन्यात साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. दरम्यान, सध्या कोरोनासह इतर रुग्णांच्या सेवेवर काही परिणाम होणार नाही याची काळजी घेत आहोत”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा : छत्रपतींचा महाराष्ट्र केवळ भाषणात नको, कृतीत दाखवा, चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI