अतिवृष्टीग्रस्तांसाठीच्या कथित 11500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये मुंबईकर कुठे? : अतुल भातखळकर

राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केलीय.

अतिवृष्टीग्रस्तांसाठीच्या कथित 11500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये मुंबईकर कुठे? : अतुल भातखळकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर


मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केलीय. तसेच अतिवृष्टीग्रस्तांसाठीच्या कथित 11500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये मुंबईकर कुठे आहे? असा सवाल केलाय. “महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं अशांना मदतीसाठी 11,500 कोटी रुपयांचं कथित पॅकेज घोषित करण्यात आलं. त्या पॅकेजमध्ये मुंबईतील बाधितांच्या मदतीचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. अतिवृष्टीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केलंय,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

अतुल भातखळकर म्हणाले, “16 ते 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून 40 पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, हजारो घरांमध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.”

“करोडो रुपयांचे नुकसान झालेल्या मुंबईकरांना मदतीच्या नावाने ठेंगा”

“2005 मधील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे तात्काळ नजर पंचनामे करावेत. महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना मदत करतानाच मुंबईतील बाधितांना सुद्धा मदत करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. परंतु केवळ मतांसाठी ‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्या ठाकरे सरकारने करोडो रुपयांचे नुकसान झालेल्या मुंबईकरांना मदतीच्या नावाने ठेंगा दाखविण्याचे काम केले आहे. हे अत्यंत संतापजनक असून मुंबई भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकारचा तीव्र निषेध करते,” असं भातखळकर यांनी सांगितलं.

सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरच मोठे जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा 15 टक्के फी सवलतीचा निर्णय निव्वळ धूळफेक, मविआ सरकार शिक्षण सम्राट धार्जिणे, अतुल भातखळकर यांचा आरोप

‘देशमुखांचे पळण्याचे मार्ग बंद, ठाकरे सरकारचंही तोंड काळं’, हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजपचा घणाघात

मुंबईत मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात; अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ पाहा :

Atul Bhatkhalkar criticize MVA government flood package on Mumbai

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI