Baramati Byelection: सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे आव्हान; बारामती पोटनिवडणुकीत शड्डू ठोकण्याचे काय कारण? इनसाईड स्टोरी वाचली का?

Baramati Byelection Sunetra Pawar Vs Congress: बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे राजकारण नवीन वळणावर पोहचले आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठ दाखवत या निवडणुकीसाठी बिगुल वाजवला आहे. त्यामुळे काँग्रेस वेगळी वाट चोखंदळत आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

Baramati Byelection: सुनेत्रा पवार यांना काँग्रेसचे आव्हान; बारामती पोटनिवडणुकीत शड्डू ठोकण्याचे काय कारण? इनसाईड स्टोरी वाचली का?
बारामती पोट निवडणूक, काँग्रेसचे काय राजकारण
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 07, 2026 | 8:52 AM

Baramati Byelection Sunetra Pawar Vs Congress: बारामती पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ही केवळ एक स्थानिक निवडणूक नाही. ती महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी खास निवडणूक मानली जात आहे. मित्र शत्रू आणि शत्रू मित्र होण्याचा नारळ इथंच फोडल्या जाण्याची सुरुवातही आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्ष राजकीस संस्कृती जपत निवडणुकीत उमेदवार न देण्याच्या भूमिकेत असताना काँग्रेसने मात्र हातघाईची लढाई सुरू केल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. बिनविरोध राजकारणाच्या संस्कृतीला काँग्रेसने फाटा दिल्याने अर्थातच राष्ट्रीय पक्षावर टीका होत आहे. मोरे हे माजी आमदार विजयराव मोरे यांचे सुपुत्र आहेत आणि या भागात मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समुदायातून ते येतात. काँग्रेसने महाविकास आघाडीच्या धोरणांना पाठ दाखवली का? असा सूरही आळवला जात आहे. काँग्रेस इतर दोन घटक पक्षांपेक्षा आक्रमक अजेंडा राबवत आहे. ही समीकरणं राज्याच्या राजकारण नवीन वळणावर तर नेणार नाहीत ना? याची चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीला काँग्रेसचा ‘हात’?

महाविकास आघाडीत काँग्रेस हा मोठा भाऊ मानल्या जातो. पण विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपात उद्धव सेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. किती दिवस राष्ट्रीय पक्षाने तडजोड करावी या विवंचनेत पक्ष आहे. 2024 मध्ये लोकसभेत डंका वाजवणारी महाविकास आघाडी कुरघोड्यांच्या राजकारणाने विधानसभेत जमिनीवर आली. आता महाविकास आघाडीच्या कुबड्यांवर राजकारण करण्याचे दिवस संपल्याचे संकेत काँग्रेस जणू देत आहे. त्यामुळे काँग्रेसची वाटचाल एकला चलो रे कडे होत असल्याचे दिसते. काँग्रेसचे विदर्भातून आलेले नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे वरिष्ठांसह राज्याच्या राजकारणात नवीन प्रयोगाची नांदी आणू पाहत आहेत. त्यासाठी इंच इंच पुढे जाण्याची रणनीती, धोरण राबवले जात आहे.

नागपूर आणि नंदुरबारमध्ये पक्षाने पकड मजबूत केली आहे. पक्ष पुन्हा राजकीय प्रवाहात आपली दमदार ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजकीय भवितव्य काय याची नाडी बहुधा काँग्रेसने ओळखली असावी. आता आघाडीच्या राजकारणात न पडता जिथे शक्य तिथे ताकद दाखवण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. राज्यसभेची जागा हातची गेली. तर विधान परिषदेची जागाही हाती लागणार नसल्याचे गणित काँग्रेसने मनाला लावून घेतल्याचेही मानले जात आहे. हे वजाबाकीचे गणित गुणाकाराने मांडण्याची घाई काँग्रेसला झाली आहे. काँग्रेसला बारामतीचा गड इतका सोपा नाही. पण मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये या निमित्ताने शंखनाद करण्याची आयती संधी काँग्रेसने सोडली नसल्याचे दिसते.

काँग्रेसमध्ये आता पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे युग अस्ताला गेले आहे. आता काँग्रेसमध्ये वऱ्हाडी आणि विदर्भातील नेत्यांचा पगडा आहे. अजूनही या नेत्यांची चार दिशेला तोंड असली तरी वऱ्हाडी ठेचा विरोधकांना खाऊ घालण्याची संधी ही नेते मंडळी शोधत असल्याचे बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उघड झाले आहे. बारामती हे केवळ निमित्त आहे. उद्धव सेना आणि शरद पवार राष्ट्रवादीला बदलत्या काळातील राजकीय धडे देण्याचा आणि भाजपला धडा शिकवण्याचा एक डाव काँग्रेस खेळू पाहत आहे. त्यातून हाती काय लागणार हा प्रश्न नाही, पण गुणाकार होईल आणि पक्षातील कार्यकर्त्यातील पराभवाची, निराशेची भावना झटकण्यात मोलाची भर पडणार आहे. पक्षाला राज्यात नवसंजीवनी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न कितपत फळाला येतो हे महिन्याभरात समोर येईलच. पण राजकारणात कोणी कुणाचा दीर्घकालीन मित्र अथवा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखित होण्याची शक्यता आहे. देर आये दुरुस्त आये असेच काँग्रेसजण म्हणत आहेत.

Follow Us