कानपट्टीवर बंदुका ठेवून चर्चा होणार नाही, संप सुरुच राहणार : शशांक राव

कानपट्टीवर बंदुका ठेवून चर्चा होणार नाही, संप सुरुच राहणार : शशांक राव

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशीही संप सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या संपाचे नेतृत्त्व जे करत आहेत, त्या शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांचा मेळावा मुंबईत घेतला. त्यावेळी त्यांनी संपाची पुढील दिशा आणि भूमिका मांडली. चर्चा करण्यासाठी संप मागे घेणार नाही, असे शशांक राव यांनी स्पष्ट केले. तसेच, कानपट्टीवर बंदुका ठेवून चर्चा करणार असाल, तर तसे होणार नाही, असेही त्यांनी ठणाकावून सांगितले.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा अस्तित्वाचा लढा आहे. हे कामगारांचं आंदोलन आहे. पगार वेळेवर मिळत नाहीत. महाव्यवस्थापक तर पगार कापायला निघालेले, असे सांगताना शशांक राव पुढे म्हणाले, “आम्ही ठरवले की मातोश्रीवर जाणार नाही. आम्ही महापौराच्या निमंत्रणवरुन महापौर बंगल्यावर गेलो.”

शिवसेनेच्या यूनियनने संपातून माघार घेतली. पण कामगारांनी सांगितले की, ही कामगार चळवळ आहे, असेही शशांक राव यांनी ठणकावून सांगितले.

“मी सांगत नाही की, उद्या मी जिंकणार आहे. शिकागोमधल्या कामगारांचं आंदोलन चिरडले गेले, पण ते कामगार रक्तात माखले आणि जिंकले. उद्या बेस्टच्या बसेस जबरदस्तीने सुरु करण्याचा प्रयत्न करुन चिरडण्याचा प्रयत्न होईल. पण संप सुरुच राहणार आहे. आपल्या बसगाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर हाणून पाडा.” असे आवाहन शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना केले.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
  • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
  • एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
  • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
  • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
  • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

मुंबईकरांचे हाल

बस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी हे टॅक्सी चालक संधीचा फायदा घेताना दिसून येत आहेत. संप असल्याने मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या काही बस सोडण्यात येत आहेत, तर जास्तीच्या लोकलही सोडण्यात येत आहे. तरीही अनेकांना टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांच्या या मजबुरीचा फायदा घेत टॅक्सी चालक त्यांच्याकडून मनमानी पैसे घेत आहेत. मीटरने न जाता वाट्टेल तेवढे पैसे हे टॅक्सी चालक प्रवाशांकडून लुटत आहेत.

BEST STRIKE: महाराष्ट्र सरकारपेक्षा मुंबई महापालिका श्रीमंत : मुख्यमंत्री

मुंबईच्या टॅक्सीचालकांची ही मनमानी काही नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ओला-उबर टॅक्सी चालकांनी संप पुकारला होता. तेव्हाही प्रवाशांकडून अशाच प्रकारची लूट करण्यात आली होती. आधीच बसेस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहे, त्यातच वाट्टेल तो भाडं सांगत हे टॅक्सी चालक प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत.

मुंबईत पाऊस असो, कुणाचं आंदोलन असो किंवा बँकेचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप असो, यात हाल मात्र मुंबईकरांचेच होतात, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून हे कर्मचारी संप पुकारतात, मात्र या सर्वांचा सर्वात जास्त फटका हा सामान्य मुंबईकरांना बसतो. दोन दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर आहेत, संप मागे घेण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये अनेक बैठका होत आहेत, तरीही मागील दोन दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यातच टॅक्सीचालकांच्या या मनमानी कारभारामुळे मुंबईकर मात्र त्रस्त झाले आहेत, सरकारने लवकरात लवकर हा संप संपवत बस सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी आता मुंबईकर करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI