नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला आहे. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करण्यात आलं आहे. पण कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच एकाच स्टँम्प पेपरवर महापालिकेने दोन करार केल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली असून या प्रकरणी महापालिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.