’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’, भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन करत किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दसरा सणाच्या निमित्ताने रावण दहनाचं वेगळं आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

'31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील', भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन करत किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप
भाजप नेते किरीट सोमय्यांकडून भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दसरा सणाच्या निमित्ताने रावण दहनाचं वेगळं आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. सोमय्या यांच्यासोबत यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते होते. खरंतर ठाण्याचे नवघर पोलीस आज (15 ऑक्टोबर) किरीट सोमय्यांच्या कार्यालयात आले होते. पोलिसांनी सोमय्यांना कलम 144 ची नोटीस दिली. यावेळी पोलीस आणि सोमय्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. नोटीस देऊन पोलीस परतले. त्यानंतर सोमय्यांनी भ्रष्टाचारी रावणाचं दहन केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्राची जनता ठाकरे-पवार माफिया सरकारच्या राक्षसी वृत्तीचं दहन करणार, हे मी वचन देत आहेत. 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील. आर्धे कोर्टात धक्के खात असतील, आर्धे ईडी, कुणी सीबीआय तर कुणी इन्कम टॅक्सकडे, तर कुणी मुंबई पोलिसात असेल. कालपासून जेलमध्ये जायची सुरुवात झालीय”, असा घणाघात सोमय्या यांनी केला.

‘अनेक मंत्र्यांवर कारवाई होणार’

“आम्ही एक वर्षापूर्वीच मंत्री जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाणार असं सांगितलं होतं. अखेर जितेंद्र आव्हाडांना अटक झाली. जितेंद्र आव्हाडांनी आनंद करमुसेंचं अपहरण केलं. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्रय दिला होता. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनाही जेलमध्ये जावं लागणार. त्यानंतर खासदार भावना गवळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अटक होणार. शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार”, असा दावा सोमय्या यांनी केला.

‘अजित पवारांच्या बेनामी प्रॉपर्टीचा मी खुलासा केला’

“उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे नातू पार्थ पवार, आमदार रोहित पवार कुठे गेले सर्व पवार? हिंदुस्तानातील सर्वात मोठी आयकर विभागाची धाड सुरुय. धाडीचा नऊवा दिवस आहे. पवारांनी किती माया (पैसे) जमावली आहे ते काही दिवसांत बाहेर येणार. अजित पवारांच्या बेनामी प्रॉपर्टीचा मी खुलासा केला. याबाबत अजित पवारांकडून आजपर्यंत काहीही स्पष्टता आलेली नाही. या घोटाळेबाजांना धडा शिकवण्यासाठी चला आपण रावण दहन करुया”, असं यावेळी सोमय्या म्हणाले.

‘घोटाळेबाज सरकारला घालवण्यासाठी मला अंदमान-निकोबार जेलमध्ये जावं लागलं तरी…’

“आज आम्ही ठाकरे-पवार घोटाळेबाज सरकारच्या भ्रष्टाचारी वृत्तीचं दहन करत आहोत. या घोटाळेबाज सरकारला घालवण्यासाठी मला अंदमान-निकोबार जेलमध्ये जावं लागलं तरी मी हसत-हसत जाणार. माझ्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा केलाय. एकवेळा काय सतरा वेळा जेलमध्ये जाणार. पण या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त सरकार करुन दाखवणार”, असं देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, ईडी, सीबीआयच्या कारवायांवरुन केंद्रावर निशाणा साधण्याची शक्यता, मेळाव्यातून शिवसैनिकांना ऊर्जा मिळणार

Published On - 6:25 pm, Fri, 15 October 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI