ठाकरेंनी हक्काची जागा मनसेला सोडली, पहिली लढत थेट शिंदेंच्या सेनेसोबत, उमेदवार कोण?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म देण्यास सुरुवात केली असून, दादर-माहीम वॉर्ड १९२ मधून यशवंत किल्लेदार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली पहिली मोठी खेळी खेळली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या रणनीतीनुसार उमेदवारांना AB फॉर्म म्हणजेच अधिकृत उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. दादर-माहीम या मनसेच्या बालेकिल्ल्यात यशवंत किल्लेदार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अखेर ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळे मुंबईच्या राजकीय समीकरणात मोठे बदल झाले आहेत. दादर-माहीम या प्रतिष्ठेच्या विभागातील जागावाटपावरून असलेला पेचही आता निकालात निघाला आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक १९२ वरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात सुरुवातीला रस्सीखेच होती. मात्र आता हा वॉर्ड मनसेला देण्यात आला आहे. ठाकरे गटाने या जागेवर आपला दावा सोडला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे.
राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी
मुंबईतील दादर माहीम विभागातील वॉर्ड क्रमांक १९२ हा शिवसेनेचा पारंपारिक गड मानला जातो. मनसेने या प्रभागातून ज्येष्ठ नेते यशवंत किल्लेदार यांना मैदानात उतरवले आहे. यशवंत किल्लेदार हे राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. या भागातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सुपूर्द केल्याने मनसे आता या मतदारसंघात पूर्ण शक्तीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वॉर्डमध्ये ठाकरे गटाकडून कुणाल वाडेकर यांच्या नावाची चर्चा रंगत आहे. त्यामुळे या मतदारसंघात किल्लेदार विरुद्ध वाडेकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दादर-माहीम पट्टा हा प्रामुख्याने मराठी भाषिक आणि मध्यमवर्गीय मतदारांचा आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठी अस्मिता आणि स्थानिक विकास हेच मुद्दे कळीचे ठरणार आहेत.
निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक
| निवडणूक टप्पा | तारीख |
| निवडणुकीची अधिसूचना | १५ डिसेंबर २०२५ |
| उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात | २३ डिसेंबर २०२५ |
| अर्ज भरण्याची अंतिम तारीख | ३० डिसेंबर २०२५ |
| उमेदवारी अर्जांची छाननी | ३१ डिसेंबर २०२५ |
| अर्ज मागे घेण्याची मुदत | २ जानेवारी २०२६ |
| उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे | ३ जानेवारी २०२६ |
| मतदानाचा दिनांक | १५ जानेवारी २०२६ |
| मतमोजणी आणि निकाल | १६ जानेवारी २०२६ |
