मध्यरात्री मोठा गेम, मुंबईतील मनसेचा हुकमी एक्का फुटला, राज ठाकरेंना धक्का
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरेंचे विश्वासू नेते संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार असून, नितेश राणेंच्या मध्यस्थीने हा मोठा राजकीय फेरबदल झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी सत्ताधारी पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. त्यातच मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे संतोष धुरी हे मनसेला रामराम करण्याची शक्यता आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे.
नाराजीचे कारण काय?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती झाली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील अनेक महत्त्वाच्या वॉर्डमध्ये चढाओढ सुरु होती. या चढाओढीत काही वॉर्ड हे मनसेच्या वाट्याला गेले आहेत. तर काही वॉर्ड हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आले आहेत. महापालिका निवडणुकांच्या जागावाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेत संतोष धुरी यांचा इच्छुक असलेला प्रभाग क्रमांक १९४ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे ते बऱ्याच दिवसांपासून नाराज होते.
लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार
याच नाराजीमुळे संतोष धुरी यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोललं जात आहे. संतोष धुरी यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे बोललं जात आहे. मात्र त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संतोष धुरी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामागे राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रात्री उशिरा नितेश राणे आणि संतोष धुरी यांच्यात एक प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत भाजपमधील त्यांच्या भविष्यातील जबाबदारीवर चर्चा झाल्याचे समजते.
संतोष धुरी आज दुपारी १ वाजता आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत मनसेचे काही स्थानिक विभागप्रमुख आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये जाऊ शकतात, असे बोललं जात आहे.
मनसेचे पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक
संतोष धुरी हे मनसेचे पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. ते मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत आहेत. मनसेच्या आक्रमक आंदोलनांमध्ये संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह संतोष धुरी यांचं नावही घेतलं जातं. मुंबईत पक्षाची बांधणी आणि आक्रमक आंदोलने यामध्ये संतोष धुरी यांचा मोठा सहभाग राहिला आहे. दक्षिण मुंबईतील मराठी मतदारांवर त्यांची मोठी पकड आहे. ज्याचा उपयोग पालिका निवडणुकीत भाजप करुन घेईल, असे बोललं जात आहे. संतोष धुरी यांच्या उमेदवारीसाठी स्वत: राज ठाकरे हे सुद्धा प्रयत्नशील होते. मात्र हा वॉर्ड शिवसेनेकडे गेल्याने ते नाराज झाले.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९४ (प्रभादेवी-दादर) मध्ये मुख्य लढत ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांच्यात होणार आहे. निशिकांत शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू असून त्यांना ठाकरे शिवसेनेने रिंगणात उतरवले आहे, तर विद्यमान नगरसेवक समाधान सरवणकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. या प्रभागावर दावा सांगणारे मनसेचे संतोष धुरी यांच्याऐवजी आता हा प्रभाग ठाकरे सेनेकडे गेल्याने येथे दोन शिवसेनामधील थेट आणि अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
