
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बरीच चर्चा झाली. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. पण काँग्रेसचे स्थानिक नेते या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी जागेसाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपात बदल न झाल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. विशाल पाटील यांनी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढण्याचं ठरवलं. या सगळ्यावर विश्वजीत कदम यांनी भाष्य केलं आहे.
सांगली लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा होता. पण काहीतरी सांगलीत शिजलं आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडून गेली आहे. आमचा सांगली जिल्ह्यावरचा दावा कोणीही संपुष्ठात आणू शकत नाही. त्यामुळे सांगली जिल्हा हा काँग्रेसचा आहे. आता काहीतरी षडयंत्र हे सांगलीच्या बाबतीत घडलं आहे. त्यामुळे जी जागा ठाकरे गटाकडे गेली. पण आम्ही हे षडयंत्र शोधून काढणार आहोत, असं विश्वजीत कदम म्हणाले.
विशाल पाटील हे आमच्यापासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कारवाई च्या संदर्भात दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल. पण विशाल पाटील असू दे किंवा मी आम्ही सांगलीत काँग्रेस वाढवण्याच काम केलं आहे, असंही विश्वजीत कदम म्हणाले.
शरद पवार हे राज्याच्या राजकारणात गेल्या 55 वर्षापासून सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असे वैयक्तिक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करणं, हे चुकीचं आहे. या टीकेमुळे समजून येत आहे की, राज्यातील भाजपच्या पायाखालची वाळूही सरकली आहे, असं विश्वजीत कदमांनी म्हटलं आहे.
यंदा शाहू महाराजांना कोल्हापूरची जनता ही निवडून देईल, हा विश्वास आहे. कारण कोल्हापूरच्या जनतेसाठी छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक धरण,शाळा आणि कॉलेज बांधले त्यामुळे जनता त्यांच्या मागे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शाहू महाराज यांच्या वारसा वरुण सुद्धा टीका ही सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. या टीकेमुळे सत्ताधारी किती अस्वस्थ आहेत हे दिसून येत आहे, असंही विश्वजीत कदम म्हणाले.