दादरमध्ये जोरदार राडा, कबुतरखाना परिसरात राडा होण्यापूर्वी काय घडलं?
दादरमधील कबुतरखान्याचे बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाने आंदोलन केले. पोलिसांनी कबुतराला अन्न देण्यास मनाई केल्यानंतर आंदोलन आक्रमक झाले. महिलांनी ताडपत्री फाडल्या आणि कबुतरखान्यात प्रवेश केला.

गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादानंतर न्यायलयाने कबुतर खाने बंद करा, असे आदेश दिले होते. दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या कबुतर खान्यातील कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली होती. या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो पूर्णपणे बंद केला होता. त्यातच आता जैन समाजातील नागरिक आक्रमक झाले आहेत. सध्या दादरमधील कबुतरखान्याजवळ मोठा राडा पाहायला मिळत आहे.
सध्या जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जैन समाजातील नागरिक जमले आहेत. कबुतरखाना परिसरात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. तसेच यातील काही आंदोलकांकडून कबुतरखान्यावर लावण्यात आलेली ताडपत्री फाडून टाकण्यात आली. तसेच पोलिसांशी वादही घालण्यात आला.
आज सकाळी काय घडले?
आज जो मोर्चा आयोजित करण्यात आला होता, त्याला स्थगिती देण्यात आली होती. पण ९.३० ते १० च्या दरम्यान अनेक नागरिक हे जैन मंदिरात प्रार्थनेसाठी आले होते. त्यातील काही महिला या जैन मंदिरासमोर असलेल्या कबुतरखान्याजवळ खाणं टाकण्यासाठी आलेले असताना पोलिसांनी त्यांना मनाई केली. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. यानंतर आक्रमक झालेल्या महिला आणि नागरिक हे थेट कबुतरखान्याच्या दिशेने धावून गेल्या. यानंतर महापालिकेने कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री फाडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर जैन समाजातील महिला या कबुतरांचे खाद्य घेऊन ते थेट कबुतरखान्यात उतरल्या. यानंतर त्यांनी ताडपत्री तोडली. तसेच बांबूचे अडथळेही काढून टाकले. गेल्या अर्धा तासापासून हे सर्व आंदोलन सुरु आहे. हा कबुतरखाना लवकरात लवकर सुरु करावा, असा आक्रमक पावित्रा जैन समाजाने घेतला आहे.
परिसरात तणावाचे वातावरण
या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसोबतही त्यांची जोरदार बाचाबाची झाली. परिणामी, वाहतूक कोंडी झाली. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हा कबुतरखाना लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी जैन समाजाने केली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर एक मोठा पेच निर्माण झाला असून, हा मुद्दा सध्या चिघळताना दिसत आहे.
