Shivsena : शायना एनसी यांच्यावर मोठी जबाबदारी; शिवसेनेचा ‘आवाज’ अजून बुलंद होणार

Shaina NC : शायना एनसी यांनी 2024 मध्ये भाजपचा राजीनामा दिला आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पक्षाचा आवाज बुलंद होईल.

Shivsena : शायना एनसी यांच्यावर मोठी जबाबदारी; शिवसेनेचा आवाज अजून बुलंद होणार
शायना एनसी, एकनाथ शिंदे
| Updated on: Aug 05, 2025 | 10:54 AM

फॅशन जगतातून राजकीय जीवनात सक्रीय होत शायना एनसी यांनी मोठी ओळख तयार केली. शायना एनसी यांनी 2024 मध्ये भाजपचा राजीनामा दिला आणि त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाने त्यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचा आवाज बुलंद होईल.

भाजपचा चेहरा ते आता सेनेची मुलूख मैदानी तोफ

शायना एनसी या भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणून ओळखल्या जात. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि महाराष्ट्र राज्याच्या कोषाध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी पेलवली आहे. त्यांना सक्रीय राजकारणात आणण्याचे श्रेय दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना जाते. 2004 मध्ये त्या भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या.

त्यांनी जवळपास 20 वर्षे भाजपची कणखरपणे बाजू मांडली. वर्ष 2013 मध्ये त्यांना पक्षाने राष्ट्रीय प्रवक्ते पद दिले. त्यानंतर अनेक टीव्ही डिबेट्स आणि सार्वजनिक मंचावर त्यांनी पक्षाची हिरारीने बाजू मांडली. अभ्यासपूर्ण आणि सयंमी विवेचन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. अक्रास्तळेपणा न करता समर्पकपणे आपली बाजू मांडण्यात त्यांची हतोटी आहे. शालीनतेने आणि अचूक शब्दांची मांडणी करत पक्षांची त्यांनी अनेकदा बाजू मांडली.

पण 2024 मध्ये त्यांनी भाजपला अचानक रामराम ठोकला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला. मुंबईतील मुंबादेवी विधानसभा तिकीट भेटल्यानंतर त्यांनी ही राजकीय कूस बदलली. एक अभ्यासपूर्ण चेहरा मिळणे ही शिवसेनेची जमेची बाजू आहे. पक्षाने आता त्यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर पक्षाचा आवाज बुलंद होईल.

गिनीज बुकने घेतली दखल

शायना एनसी यांनी जगातील सर्वात वेगवान साडी नेसण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला आहे. याशिवाय त्या अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या दोन एनजीओ, आय लव्ह मुंबई आणि जायंट्स वेलफेअर फाऊंडेशन या मुंबईत पर्यावरण आणि सामाजिक कल्याण कामासाठी कार्यरत आहेत.

फॅशन जगतात पण नाव

शायना एनसी यांनी क्वीन मेरी शाळेतून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी मिळवली. न्यूयॉर्कमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून फॅशन डिझायनींमध्ये डिप्लोमा घेतला. मनीष मुनोत यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले आहे. राजकीय, सामाजिक जीवनासोबतच त्यांनी कुटुंबाशी समतोल साधला आहे.