गटारीत पडलेल्या दिव्यांशला शोधण्यात अपयश, शोधमोहीम थांबवली!

उघड्या गटारीत पडलेल्या  दीड वर्षाच्या चिमुकल्या दिव्यांशचा (Divyansh Singh) शोध थांबवला आहे. 48 तास उलटून गेल्यानंतरही गटारीत वाहून गेलेला दिव्यांश सिंह अद्याप सापडलेला नाही.

गटारीत पडलेल्या दिव्यांशला शोधण्यात अपयश, शोधमोहीम थांबवली!


मुंबई : उघड्या गटारीत पडलेल्या  दीड वर्षाच्या चिमुकल्या दिव्यांशचा (Divyansh Singh) शोध थांबवला आहे. 48 तास उलटून गेल्यानंतरही गटारीत वाहून गेलेला दिव्यांश सिंह अद्याप सापडलेला नाही. नाईलाजानं मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन विभागानं ही शोधमोहीम थांबवली. गेल्या 48 तासांत अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 किमीच्या परिसरातील ड्रेनेज लाईन, मॅनहोल या ठिकाणी दिव्यांशचा शोध घेतला. एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले, मात्र हाती काहीच लागलं नाही.

शोधमोहीमेच्या शेवटच्या टप्प्यात ड्रोन कॅमेऱ्यानेही दिव्यांशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिव्यांश न सापडल्यानं अखेर ही शोधमोहिम थांबवत असल्याचं मुंबई महापालिका आपत्कालिन विभागाकडून सांगण्यात आलं.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

10 जुलैच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळच्या आंबेडकर चौकात आईसोबत दीड वर्षाचा चिमुकला दिव्यांश सिंह दुकानात आला होता.  खेळता खेळता दिव्यांश रस्त्यावर आला. रस्त्याकडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठी वळत असताना पाय घसरुन तो नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडला. त्याची दृश्य शेजारीच असलेल्या मशिदीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि कुटुबीयांचा आक्रोश सुरू झाला. .

11 जुलै

पहाटे 3 वाजता अग्निशमन दलानं गटारीत दिव्यांशचा शोध सुरू केला. तब्बल पाच उलटले होते. पण, दिव्यांशचा शोध काही लागत नव्हता.

11 जुलै 2019, सकाळी 10.30 वाजता 

बारा तास उलटले होते. पण, अद्यापही दिव्यांश बेपत्ताच होता. आता मात्र स्थानिक संतप्त झाले होते. गेल्या चार वर्षापासून महापालिकेनं ही गटारं उघडीच ठेवल्याचा आरोप करत होते.

11 जुलै 2019, दुपारी 1 वाजता

15 तास उलटत आले होते. अजूनही दिव्यांशचा शोध लागत नव्हता. संतप्त रहिवाशांनी आणि दिव्यांशच्या कुटुंबीयांनी महापौर येण्याआधीच पालिका प्रशासनाचा निषेध करत रास्तारोको आंदोलन सुरू केलं.

11 जुलै 2019, दुपारी 1.30 वाजता 

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि दिव्यांशच्या कुटुंबीयांची भेट घेतली. एसडब्ल्यू डी डिपार्टमेंटचे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासनही दिलं.

12 जुलै 2019, सकाळी 11.30 वाजता 

जवळपास 37 तास उलटले होते. दोन दिवसात एनडीआरएफच्या शोध पथकांना दहा किलोमीटरची गटार शोधून काढली होती. पण, अद्यापही दिव्यांशचा शोध काही लागत नव्हता.

12 जुलै 2019, दुपारी 2.30 वाजता 

आता तब्बल चाळीस तास उलटले होते. अजूनही दिव्यांशचा शोध लागत नव्हता. कुटुंबीयांच्या संयम सुटत होता. अखेर दिव्यांशचे वडील सुरज सिंह आणि सामाजिक कार्यकर्ते श्रवण तिवारी यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला.

12 जुलै 2019,  सायं. 7 वाजता 

आता मात्र दिव्यांश नेमकं काय झालं, गटारीत पडलेला दिव्यांश नेमका गेला कुठे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. कारण, तब्बल 45 तास उलटल्यानंतर दिव्यांशचा शोध लागला नाही. शोध पथकांची शोधमोहिम अद्यापही सुरूच होती.

12 जुलै 2019 रात्री 10 वाजता 

जवळपास 48 तासानंतर दिव्यांशचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या बचाव पथकांनी आपलं शोधकाम थांबवण्याचा निर्णय घेतला. 10 किमीची गटारं पिंजूनही हाती काहीच लागलं नाही.

एकंदरीतच, दोन दिवस उलटल्यानंतरही दिव्यांशचा शोध लागू शकलेला नाही. उघड्या मॅनहोलनं दिव्यांशला गिळंकृत केलं पण अद्यापपर्यंत दिव्यांश सापडलेला नाही. त्यामुळं दिव्यांश कधी सापडणार ? दिव्यांशच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलाचा चेहरा पाहता येईल की नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहे. मॅनहोल उघडे ठेवणारे पालिकेचे कारभारी आता तरी लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करतील का? हाच खरा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या 

खुल्या गटारात चिमुरडा पडला, मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI