श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येताना कपड्यांचे भान राखा, ड्रेस कोड लागू
श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी येताना भारतीय परंपरेला साजेसे, सार्वजनिक जागेत शोभेल असेच पारंपारिक वस्त्र परिधान करून महिलांनी आणि पुरुषांनी मंदिरामध्ये यावे असे पत्रकामध्ये म्हटले आहे.

कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील दादर-प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाता आता तुम्हाला तुमच्या कपड्यांचे भान राखावे लागणार आहे. कारण मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. सिद्धिविनायक मंदिरात देशभरातले श्रद्धाळू आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे दर्शन करण्यासाठी येत असतात. संकष्टीला येथे भल्या मोठ्या रांगा लागतात. भक्तांना आता येथे दर्शनाला येताना साजेसे कपडे परिधान करावे लागणार आहेत. अन्यथा अशा भक्तांना आत सोडले जाणार नाही असे मंदिराच्या प्रशासनाच्या वतीने म्हटले आहे.
मुंबईतील प्रभादेवी येथील जागृत देवस्थान असलेल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात मंगळवार पासून ड्रेस कोड लागू केला आहे. या संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासाने अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार गणेशभक्तांनी दर्शनाला सिद्धिविनायक मंदिरात इतर नागरिकांना संकोच वाटणार नाही असे भारतीय परंपरेला शोभेल असे कपडे परिधान करावे असे मंदिर न्यासाने म्हटले आहे. भाविकांना अंगभर कपडे घालावेत, हा नियम सर्वांना बंधनकारक करण्यात आला आहे. जर या ड्रेस कोडचे उल्लंघन झाले तर मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या निर्णयावर वाद होण्याची शक्यता आहे.
देशभरातील अनेक देवस्थानात ड्रेस कोड
देशातील अनेक देवस्थानात भक्तांसाठी वस्र आचार सहिंता लागू आहे. कोणात्याही पुरुष अथवा महिलेने मंदिरात अशोभनीय कपडे परिधान करु नयेत. तसेच तोकडे कपडे घालून जर कोणी भक्त आला तर त्याला शाल आणि धोतर काही ठिकाणी पुरविले जाते. ड्रेस कोड वरुन अनेकदा वाद देखील होत आहेत. महिलांना मिनी स्कट तसेच जीन्स घालण्यास अनेक मंदिरात बंदी आहे. पुरुषांना देखील या ड्रेस कोडमधून सुटका नाही. दक्षिणेतील अनेक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
