ठाकरे सेनेच्या मुंबईतील शिबिराला एकनाथ शिंदे, भाजपाला निमंत्रण, कारण तरी काय? काय म्हणाले संजय राऊत

Eknath Shinde, BJP invited to Udhav Thackeray Sena : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आज मुंबईत निर्धार शिबीर होत आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला यांना शिबिरासाठी निमंत्रण दिले आहेत.

ठाकरे सेनेच्या मुंबईतील शिबिराला एकनाथ शिंदे, भाजपाला निमंत्रण, कारण तरी काय? काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 09, 2025 | 11:05 AM

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आज मुंबईत निर्धार शिबीर होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतरची पक्षाची वाटचाल आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे या शिबिरात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. दरम्यान या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला सुद्धा निमंत्रण दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आज माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली.

एकनाथ शिंदे, भाजपाला केले टॅग

संजय राऊत यांनी निर्धार शिबिराविषयी माहिती दिली. त्यांनी याविषयीचे ट्विट सुद्धा केले. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाला टॅग केले. त्याविषयी माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपाला या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती दिली. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांना दिली.

आज सकाळी 10 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरे या शिबिराचे उद्धघाटन करणार आहेत. तर उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. संपूर्ण राज्यातील शिवसैनिकांसाठी अशा प्रकारचे शिबिरं आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक

विधानसभा निवडणूक काळात महायुतीचे नेते लाडकी बहीण योजनेविषयी दावे करत होते. तर आम्ही ही फसवणूक असल्याचे सांगत होतो. 1500 रुपयांना बहि‍णींची मतं विकत घेतली आणि 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. बहि‍णींनी मतं दिली पण सरकारकडे पैसे नाहीत. वृद्ध कलाकारांचं मानधन सुद्धा सरकारने थकवले आहे. हे सरकारच्या खिशातील पैसे नाही तर जनतेच्या करातील पैसे आहेत. महायुतीने त्याचे राजकारण केले. जोपर्यंत जनता बंड करत नाही, तोपर्यंत अशी फसवणूक सुरूच राहिले असे राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे आणि आमदारांवर टीका सुद्धा केली.