
राज्यात महायुतीच्या सरकारचे घोडे एकदाचे सत्तेच्या गंगेत नहाले. बहुमताचे सरकार असतानाही शपथविधीसाठी 10-11 दिवसांचा कालावधी लागला. आझाद मैदानावर महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. आता सर्वांना मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे लागले आहे. खाते वाटपावरून तीनही पक्षात जोरदार रस्सीखेच होणार आहे. भाजपा हा संख्याबळानुसार मोठा भाऊ आहे. तर त्यानंतर शिंदे सेना आणि अजितदादांचा पक्ष रांगेत येतो. त्यात ही मलईदार आणि महत्त्वाची खाती कुणाकडे असावीत यावर आता खल सुरू झाला आहे. गृह विभागासाठी शिंदे सेना अजूनही आग्रही असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्यांना त्या तोडीचे एखादे खाते देण्याचा भाजपाचा प्रस्ताव आहे. गृहखात्याऐवजी या तीन खात्यापैकी एकाची निवड शिंदे सेनेला करावी लागणार आहे.
पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार
महायुतीच्या नेतृत्वाचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. आता मंत्रिमंडळाचा विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होईल. तेव्हा इतर मंत्र्यांचा शपथविधी उरकण्यात येईल. पण खरा प्रश्न आहे तो महत्त्वपूर्ण खाती आपल्याकडे घेण्यासाठी दबाव तंत्राचा, येत्या दोन-तीन दिवसात त्यावरून रंगलेले नाट्य उभा महाराष्ट्र पाहील. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची खाते वाटपासंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे.
दादा गटाची अगोदरच बैठक
दरम्यान राष्ट्रवादीचे मंत्रीपदाबाबत अजित पवार यांच्या निवासस्थानी एक बैठक झाल्याचे समोर येत आहे. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात ही बैठक झाली. त्यात 7 कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्य मंत्र्यांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये छगन भुजबळ. धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, संजय बनसोडे, दत्तामामा भरणे, इंद्रनील नाईक आणि संग्राम जगताप यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.
संख्याबळाचा फॉर्म्युला
राज्यात एकूण 43 मंत्रिपद आहेत आणि महायुतीच्या आमदारांचा संख्याबळ 230 इतकी आहे. त्यातही भाजपाकडे 132 आमदारांचे मोठे संख्याबळ आहे. तर राष्ट्रवादीपेक्षा आमच्याकडे अधिक संख्याबळ असल्याची चर्चा शिवसेनेकडून सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गट महत्त्वाच्या खात्यासाठी आग्रही असणार आहे. खाते वाटपात भाजप नेत्यांना महत्त्वाची खाती दोन्ही मित्र पक्षाकडे सोपवणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे खाते वाटपापूर्वीच भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे.
गृहमंत्रालयाच्या बदल्यात हे तीन पर्याय
शिंदे सेना गृहमंत्रालयासाठी आग्रही आहे. शिंदे यांनी शपथविधी पूर्वी त्यासाठीचे संकेत दिले आहेत. शपथविधीला अवघे काही तास उरले असताना सुद्धा त्यांनी दबाव तंत्राची झलक दाखवली. त्यामुळे भाजपाने गृहमंत्रालयाच्या ऐवजी शिंदे सेनेपुढे तीन खात्यांचा पर्याय समोर ठेवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांबाबत विचार करा, असा शिवसेनेला भाजपने सल्ला दिला आहे. शिवसेनेला या 3 खात्यांच्या पर्यांयांपैकी 1 पर्याय निवडावा लागणार आहे. गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीस तोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही आहे. ऊर्जा, गृहनिर्माण खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.