
नवी मुंबई हे ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षांचं मोठं केंद्र ठरत आहे. महायुतीतच येथे ठिणगी पडली आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटात विस्तवही जात नसल्याचे दिसत आहे. दोन्ही गटातील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. गणेश नाईकांची तोफ सातत्याने आग ओकत आहे. आता ही एका कार्यक्रमात नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता हल्लाबोल चढवला. त्यांनी शिंदे सेनेचे खरपूस समाचार घेतला. काय म्हणाले गणेश नाईक?
गणेश नाईकांचा शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल
आम्हाला ती 14 गावं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नको. नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक झाल्यानंतर ही सर्व गाव आपण बाहेर काढू. निश्चित सर्व गाव बाहेर निघतील, असा दावा त्यांनी छातीठोकपणे केला. निवडणुकीनंतर पुढील 6 महिन्यात ही गावं बाहेर काढण्यात येतील असे ते म्हणाले. कुणाच्यातरी लहरीपणामुळे झालेल्या गोष्टी आणि त्याचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. या 14 गावांमध्ये कुर्ल्यातील कंपन्या आल्यात. तिथलं पाणी दुषीत झालं. त्यांचा बोजा नवी मुंबईवर पडत आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
शिंदेवर जहरी टीका
तुम्ही दयावान नसल्याचा टोला त्यांनी शिंदेंना नाव न घेता हाणला. तुम्ही भविष्याचा विचार करणार की नाही, असा सवाल नाईकांनी केला. नवीन एफएसआय लागू झाला तर या शहराची वाट लागेल. आज नवीन मुंबईत काही ठिकाणीच पाणी साचतं, तुंबापूरी होत नाही. कारण आपण या शहरांच्या नाल्याची रचना तशी केली आहे. पण जर नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका सत्ता गेली तर या शहराचा वाटोळ झालं म्हणायचे, असा हल्लाबोल त्यांनी शिंदे सेनेवर केला. आपण जबाबदारीने हे विधान करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मनात कुणाविषयी द्वेष नाही. गणेश नाईक सुखी आहे. जो पैसा माझी झोप उडवील तो पैसा मला नको आहे. आयटीचे लोकं येतील, लुटारू येतील, सीबीआय येईल. सुखाची झोप मिळते, मग असा पैसा काय कामाचा, माझा हात साफ आहे आणि मन पण साफ आहे, असा चिमटा त्यांनी काढला.