मला माझा आवाका माहिताय, उंटाचा मुका घेणार नाही, सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Mumbai rally) यांनी मुंबईतील खार इथून विधानसभेचं रणशिंग फुंकलं. मनसेची (Raj Thackeray Mumbai rally) पहिली सभा खार इथं पार पडली.

मला माझा आवाका माहिताय, उंटाचा मुका घेणार नाही, सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Mumbai rally) यांनी मुंबईतील खार इथून विधानसभेचं रणशिंग फुंकलं. मनसेची (Raj Thackeray Mumbai rally) पहिली सभा खार इथं पार पडली. राज ठाकरे यांची पहिली सभा काल पुण्यात होती,  मात्र पावसामुळे ती रद्द झाली. राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष द्या, असं अनोखं आवाहन केलं.

माझी विधानसभेची भूमिका आहे, एक मागणी करायला आलो आहे.  राज्याला जी गरज आहे ती एक कणखर विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधीपक्ष नेता सरकारला नामोहरम करू शकतो. प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आज समोर आलो आहे. आता पर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने ही मागणी केली नाही ती मी आज करतोय , असं राज ठाकरे म्हणाले.

आजच्या घडीला सर्व राजकीय स्थिती पाहता, मला माझा आताचा अवाका माहीत आहे. विनाकारण जाऊन उंटाच्या ढुंगणाचा मुका कोण घेत बसणार. आपल्या आपल्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत, सत्ता नको, प्रबळ विरोधीपक्ष म्हणून संधी द्या, असं राज ठाकरे म्हणाले.

भाषणासाठी वेळ कमी मिळतो, प्रवासात वेळ जास्त जातो, मुंबईत ट्रॅफिकचा फटका बसतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात मुंबईतील ट्रॅफिक जॅम आणि शहरांच्या बकाल अवस्थांवरुन केली.

कालची पुण्याची सभा वादळी पावसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. शहरांचा पार विचका झालाय. अर्ध्या तासाच्या पावसाने पुण्याची जरी अशी अवस्था होत असेल तर काय बोलायचं?, असं राज ठाकरे म्हणाले.

शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदार गप्प बसतात मग तुमचे प्रश्न मांडणार कोण? पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीत. बरं या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतात, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार? आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. काय झालंय लोकांना त्यांच्या जाणिवांना? जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं? आपण सत्ताधाऱ्यांना कधी प्रश्न विचारणार आहोत? अशी प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली.

मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय; ते मागणं म्हणजे, ह्या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणारा विरोधी हवाय. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो,मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय. आज गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल आणि म्हणून मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन आलोय, असं राज ठाकरे म्हणाले.

जेंव्हा जेंव्हा आपल्या सणांवर बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली आणि सण साजरे केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, कारण माझे उमेदवारच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतील, त्यांना उत्तरं द्यायला भाग पाडतील, मनसे सारखा जो पर्यंत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तोपर्यंत हे सरकार तुमचं कोणतंही काम करणार नाही.  काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेतेच भाजपात गेले, जनतेच्या मनातली खदखद मांडणार कोण? सत्ताधारी पक्ष शब्दही काढत नाही, या सगळ्या समस्यांवर बोलणार कोण?, असा प्रश्न विचारत मला सत्ता नको, विरोधी पक्षपद द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI