
मराठा आरक्षण जीआर प्रकरणावर आणि मराठा समाजाची फसवणूक झाल्याबाबत उद्धव ठाकरे सेना लागलीच प्रतिक्रिया देणार नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. याप्रश्नी मराठा समाजाचे समाधान झाल्याचे सध्याचे चित्र असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा मोठा प्रयत्न त्यांच्याच सहकाऱ्यांनी केल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला. पण फडणवीसांनी त्यातून मार्ग काढल्याची स्तुतीसुमनं पण त्यांनी उधळली. त्याचवेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी प्रश्नावरून चांगलेच डिवचले. काय म्हणाले राऊत?
फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा डाव
मराठा-ओबीसी संघर्ष वाढले असे आपल्याला वाटत नाही. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकार मधील काही घटक आजही करत आहेत. सरकारमधील काही सहकाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेऊच नाही आणि सरकार अडचणीत यावं असं वाटतं होतं. महायुती ही तीन चाकाची रिक्षाच आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यात आलं. शिंदे यांनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप राऊतांनी केला. मराठ्यांना आरक्षण देणं हा त्यांचा हेतू नव्हता. तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्थिर करणं, त्यांच्यासमोर आव्हानं उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केला. फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न या आंदोलना आडून सुरू होता. पण उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर फडणवीस सरकारने त्यात तोडगा काढण्याचे काम केल्याचे राऊत म्हणाले.
तर भुजबळांनी राजीनामा द्यावा
मंत्री छगन भुजबळ हे मराठा आरक्षण जीआरविरोधात न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत तर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याविषयी पत्रकारांनी राऊतांची प्रतिक्रिया जाणून घेतली. राऊतांनी यावेळी भुजबळ यांना डिवचले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. पण ओबीसींचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नाराजीवर लक्ष घातले आणि मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याचे राऊत म्हणाले. अजित पवारांच्या कृपेमुळे भुजबळ मंत्रिमंडळात नाही, तर नरेंद्र मोदींची कृपा असल्याचा दावा राऊतांनी केला. सगळ्यांचा विरोध डावलून भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. आता भुजबळच नाराज आहेत, असं दिसतंय त्यामुळे आता भुजबळ हे मोदींना जाऊन भेटतील आणि आवश्यक घटना दुरुस्ती करून आणतील असा चिमटा राऊतांनी काढला.
भुजबळ हे नाराज आहेत की नाही, यापेक्षा ते मंत्रिमंडळात समाधानी आहेत, असे दिसते. भुजबळ हे नाराज असतील तर ते राजीनामा देतील का? जर एखाद्या समाजावर अन्याय झाला आणि आपण त्या समाजाचे नेतृत्व करतो तर ते राजीनामा देणार आहेत का? त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर तत्कालीन अर्थमंत्री सीडी देशमुख यांचे नेहरूंशी मतभेद झाल्यावर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला ,याची भुजबळांनी आठवण करून दिली. तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत आहात. मग भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या कारणासाठी मी राजीनामा देत आहे हे स्पष्ट केले पाहिजे. कॅबिनेटवर जर भुजबळ बहिष्कार टाकत असतील तर स्वाभिमान आणि नैतिकतेला धरून भुजबळांनी राजीनामा द्यायला हवा असा टोला राऊतांनी यावेळी लगावला.
महाराष्ट्र जाती-पातीत कधीच इतका वाटला गेला नव्हता. गेल्या 10 वर्षात या देशात जाती-पोटजातीचे राजकारण सुरू आहे. मराठी माणसांच्या एकजुटीला फोडण्यासाठी पक्ष फोडले. तसाच हा प्रकार आहे. आता जातींच्या उपसमित्या तयार करून हाच मार्ग अवलंबल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.