अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत, मासेमारांना सतर्कतेचा इशारा

भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील, असेही सांगण्यात आले आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत, मासेमारांना सतर्कतेचा इशारा


मुंबई : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील, असेही सांगण्यात आले आहे.

हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, मात्र त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील. तसेच किनारपट्टीजवळील समुद्र काही प्रमाणात खवळलेला असेल. कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षेसाठी मासेमारांनी 11 आणि 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

रायगडसह कोकण किनार पट्टीवर पुढील 48 तासात 30-40 किमी वेगाने विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळी वारे झाल्यास रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्याजवळील घरांना आणि कच्च्या बाधंकामांनाही यामुळे धोका आहे. अशी बांधकामं पडू शकतात, विजेचे खाबं उखडून ताराही गळून पडण्याची शक्यता आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. अनेक पर्यटक अलिबागसह रायगड आणि कोकणातील विविध समुद्र किनारी पर्यटनाला गेलेली असून त्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बंगालच्या उपसागरात ‘फनी’ चक्रीवादळ निर्माण झाले होते. ते ताशी 200 किमी वेगाने ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं होतं.  त्यात ओडिशा सरकारने घेतलेल्या खबरदारीमुळे मोठे नुकसान टाळण्यात यश आले होते. प्रशासनाने येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या उपाय योजनांचे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI