Weather Forecast : पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे, गरज असेल तरच बाहेर पडा, अनेक राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रावरही मोठं संकट
अनेक राज्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशासह राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस 18 मार्च ते 21 मार्च पर्यंत अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग( IMD) कडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पूर्व आणि मध्य भारतामध्ये पुढील चार दिवस 18, 19, 20 आणि 21 मार्चपर्यंत वादळी वारा, विजांच्या कडकडाट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, छत्तीसगड या राज्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला असून, वाऱ्याचा वेग देखील ताशी 50-70 किमी प्रतितास एवढा प्रचंड राहणार आहे.
दक्षिण भारताला इशारा
दरम्यान हवामान विभागाकडून दक्षिण भारतामध्ये देखील मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतामध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि इतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर पश्चिम भारत
उत्तर पश्चिम भारताला देखील अवकाळी पाऊस चांगलाच झोडपून काढणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर पश्चिम भारताला हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष: मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30-40 कीमी इतका असू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं असून, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
