
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त आहे. शिरसाट यांना उत्पन्नात वाढ झाल्याच्या कारणामुळे नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर शिरसाट यांनी मीडियासमोर आपली बाजूही मांडली आहे. मात्र, सत्तेतील एकाच पक्षाच्या दोन नेत्यांना नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
संजय शिरसाट यांना आयटीने नोटीस पाठवली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या तक्रारीवरून संजय शिरसाट यांना नोटीस बजावण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर येथील व्हिट्स हॉटेल प्रकरणी विरोधकांनी शिरसाट यांच्यावर आरोप केले होते. शिरसाट यांचा मुलगा हे हॉटेल खरेदी करत होता. विरोधकांच्या आरोपानंतर शिरसाट यांच्या मुलाने या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली होती. त्याबाबत आयकर विभागाकडे तक्रार गेल्याने त्यांनी संजय शिरसाट यांना नोटीस पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर माझ्यावरील आरोपात तथ्य नाहीये. आम्ही नोटिशीला वकिलामार्फत योग्य ते उत्तर देऊ, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयकर विभाग आणि इतर विभाग आपलं काम करत असतात. त्यात काही चुकीचं नाहीये. 2019 आणि 2024मध्ये मालमत्तेत झालेल्या वाढीचं स्पष्टीकरण आयकर विभागाने मागितलं आहे. त्यांचं काम ते करत आहेत. इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई होत नाही, असं काही नाही. या नोटिशीचं मी उत्तर देणार आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
काही लोकांनी माझ्या विरोधात तक्रार केली होती. त्याची दखल आयकर विभागाने पाठवली. 9 तारखेला उत्तर देण्यास आयकर विभागाने सांगितलं होतं. आम्ही वेळ मागवून घेतला. आम्ही काही चुकीचं केल नाही. आयकर विभागाला फक्त उत्तर हवं आहे. स्पष्टीकरण हवंय की हे कसं झालं? त्याला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ, असं शिरसाट यांनी सांगितलं.
काही लोकांची पोटदुखी आहे. त्याला समर्थपणे उत्तर देऊ. माझं यंत्रणेवर ऑब्जेक्शन नाही. माझ्यावर कुणाचा दबाव नाही. कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्ही चिंता करू नका. शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न होतोय असं मी म्हणत नाही. एजन्सी त्यांचं काम करत आहे, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
मी कुणाच्याही रडारवर नाही. तसं म्हणता येत नाही. आयटी विभाग काम करतंय, आम्ही त्यांना माहिती देऊ. आमच्यावर दबाव नाही. यंत्रणा असतात, त्यांना विवरणात तफावत वाटली तर त्यांना तपासण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यांना सहकार्य करू. 2024 च्या निवडणुकीत आम्ही शपथपत्रात विवरण दिलं आहे. त्यात उल्लेख आहे. तरीही आयकर विभागाला स्पष्टता हवी म्हणून त्यांनी नोटीस दिली आहे. त्यात एवढं सीरिअस घेण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.
आयकर विभाग प्रत्येकाची छाननी करत असतो. मला आणि श्रीकांत शिंदेंना नोटीस आली आहे. प्रत्येकाला नोटीस येते. मी नोटिशीला उत्तर देणार. कोणतीही नोटिस आली तर सामोरे गेलं पाहिजे. त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असं त्यांनी सांगितलं.