
MP Supriya Sule Big Allegation : लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे हस्तांतरण (Direct Beneficiary Transfer-DBT) प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी सवाल उभा केला. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. राज्य सरकारने या घोटाळ्याची सामुहिक जबाबदारी घ्यावे असे त्या म्हणाल्या.
मी आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही
लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्र्यांना आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही, करणार नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे. त्यामुले या प्रकरणात कुणावरही खोटे आरोप करणार नाही. आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या संशयाची सुई कोणावर आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत सुळे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
4,800 कोटींचा भ्रष्टाचार
लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी थेट आकडाच समोर आणला. सरकारने जी आकडेवारी दिली त्यातूनच हा 4 हजार 800 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड होते. हा घोटाळा कुणी केला, कसा केला, त्यात कोणाचा सहभाग आहे. बँकेचा आहे की अन्य कुणाचा यावर काही सांगता येणार नाही. आल्याने आता सरकारी गोटातून त्यावर काय प्रतिक्रिया उमटते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मग DBT चा फायदा काय?
डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, डीबीटी, थेट हस्तांतरण प्रक्रियेतून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वळते होतात. त्यासाठी अनेक नियम आणि चाळणी प्रक्रिया आहे. एक एक कागद तपासला जातो. आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स तपासले जातात. लाडकी बहीण योजनेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा गेला. मग त्यावेळी पुरूषांच्या खात्यात पैसा जात आहे हे समोर आले नाही का? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे डिजिटल इंडियाच्या कारभारावर त्यांनी थेट आक्षेप नोंदवला. डीबीटीतून पुरूषांच्या खात्यात पैसा वळता होणे म्हणजे डिजिटल इंडियाचे अपयश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने आता या घोटाळ्याची सामुहिक जबाबदारी घेण्याची मागणी त्यांनी केली.