
Maharashtra Local Body Election Update: आताच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. राज्य निवडणूक आयोगाने काही प्रभागातील निवडणूक (Ward Election) थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याविषयी फैसला येण्याची शक्यता आहे. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यासंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता आहे. अनेक जण या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवत आहेत. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
या ठिकाणी निवडणूक थांबवण्याचे आदेश
राज्यातील 3 प्रभागांमधील निवडणूक थांबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस मात्र कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. काही प्रभागातील निवडणूक मात्र या निर्णयाने बाधीत झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह वाटप आणि प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. पण या तीन ठिकाणी निवडणूक थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील दोन ठिकाणी निवडणूक नाही
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील दोन ठिकाणी निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचा मृत्यू झाल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याविषयीचे निवडणूक आयोगाचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.
तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचेही निधन झाले आहे. भाजपकडून प्रभाग 2 ब मध्ये त्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पाथरे यांचे निधन झाल्याने या प्रभागातील निवडणूक आता स्थगित करण्यात आली आहे.
बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा तिढा, दोन जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
बारामती नगरपरिषदेची निवडणूक ही सातत्याने चर्चेत येत आहे. आता बारामची विधान परिषदेच्या निवडणुकीत आणखी एक मोठा तिढा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये यंदा मोठा तिढा निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र, नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व जागांच्या निवडणुका पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
प्रभाग क्रमांक 13 (ब) व प्रभाग क्रमांक 17 (अ) या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश आल्या नंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या स्वीकृतीवर तांत्रिक बाबी वरून अर्ज नामंजूर करण्यात आले होते मात्र यानंतर भाजपचे ते सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेऊन यावर याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने सुनावणीनंतर हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.
धाराशिव नगरपरिषदेच्या तीन प्रभागांची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2,7 आणि 14 या प्रभागांची निवडणूक स्थागित करण्यात आली आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने उमेदवारी अर्जाच्या छानणीनंतर घेतलेल्या निर्णया विरोधात उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा न्यायालयात झाली होती सुनावणी, मात्र न्यायालयाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत, न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जागेवरची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र यासंदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय येण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. तर बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 मधील दूरदानाबेगम सलीम फारुकी यांचे निधन झाल्याने या ठिकाणच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे.